विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. विविध मतदारसंघातील नेते, इच्छुक तयारीला लागले आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपमधील नेत्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता भाजपमधूनच माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नखाते एकवटले आहेत. माजी नगरसेवकांची बैठक घेऊन जगताप कुटुंबाला विरोध दर्शवला आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप किंवा आमदार अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध होत आहे. माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते आणि शत्रूघ्न काटे यांनी एकत्र येत माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला काही नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
हेही वाचा – मोबाइल चार्जर पाच लाखांना, सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची फसवणूक
हेही वाचा – पुणे : मोटारीची काच फोडून ऐवज चोरणारा तामिळनाडूतील चोरटा गजाआड
जगताप कुटुंबातील व्यक्तींना सोडून आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी तरच आम्ही पक्षाचे काम करू असा ठराव या बैठकीत करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. बैठकीला माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, शत्रूघ्न काटे, संदीप कस्पटे, कैलास बारणे, सिद्धेश्वर बारणे, बाळासाहेब ओव्हाळ, माधुरी कुलकर्णी, सुनीता तापकीर, सविता नखाते, यांच्यासह भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राज तापकीर, शहर उपाध्यक्ष राम वाकडकर आदी उपस्थित होते.