पिंपरी : अपुरा पाणीपुरवठा, टँकर लॉबीचे वर्चस्व, वाहतूक नियोजनाचा अभाव, वाढते प्रदूषण, अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे अशा प्रश्नांना सामोरे जाणारा चिंचवड विधानसभा मतदारसंघ यातून सुटकेची वाट पाहतो आहे. हे प्रश्न प्रलंबित असून, वारंवार पाठपुरावा करुनही तोडगा निघत नसल्याने या भागातील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
राज्यातील सर्वाधिक मतदारसंख्येचा मतदारसंघ अशी चिंचवडची ओळख. पिंपळेगुरव, पिंपळेनिलख, पिंपळेसौदागर, सांगवी, थेरगाव, वाकड, चिंचवड, वाल्हेकरवाडी, किवळे, रावेत, पुनावळे असा परिसर या मतदारसंघात येतो. यापैकी रावेत, वाकड, पुनावळे, किवळे परिसरात गगनचुंबी गृहनिर्माण सोसायट्या उभ्या राहत आहेत. हा भाग झपाट्याने विस्तारत असून, लोकसंख्येत मोठी भर पडत आहे.
हेही वाचा…काँग्रेसला बंडखोरी रोखता आली नाही ही शोकांकिका कोणी केली ही टीका !
वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा करण्यात महापालिका प्रशासनाला अपयश येत आहे. महापालिका एक दिवसाआडही पुरेसा पाणीपुरवठा करू शकत नाही. त्यामुळे या भागातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांना टँकरवर लाखो रुपये खर्च करावा लागतो. टँकर व्यावसायिकांनी पाण्याच्या व्यवसायातून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यामुळे ही पाणी टंचाई या ‘लॉबी’ला पोसण्यासाठी केली जाते का, असा प्रश्न उपस्थित केला जातो. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. परंतु, त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. हिंजवडीतील माहिती तंत्रज्ञाननगरीचा रस्ता थेरगावातील डांगे चौकातून जातो. त्यामुळे ये-जा करणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी असल्याने सकाळी आणि संध्याकाळी भूमकर चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. प्रशस्त रस्ते असूनही वाहतूक कोंडीत भर पडते. कारण, पदपथ तसेच रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून, त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. वाहतूक नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
मतदारसंघात समतोल विकासाचा मोठा अभाव आहे. पिंपळेगुरव, पिंपळेसौदागर, पिंपळेनिलख, रावेत भागाचा प्रचंड विकास झाला. त्या तुलनेत किवळे, थेरगाव, वाल्हेकरवाडी परिसराचा विकास झाला नाही. या भागात अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर आहे. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न जैसे थे असून, घरांवरील कारवाईची टांगती तलवार कायम आहे. प्रस्तावित वर्तुळाकार मार्गाला (रिंग रोड) नागरिकांचा विरोध आहे. रावेतवर रेड झोनचे संकट आहे.
हेही वाचा…विधानसभा निवडणुकीसाठी वंचितचे ‘जोशाबा समतापत्र’ प्रसिद्ध, नक्की काय म्हंटले त्यात !
चिंचवडमधून वाहणाऱ्या पवना नदीत सांडपाणी थेट सोडले जाते. प्रदूषित पाणी आणि जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना डासांचा मोठा त्रास होतो. पवना, मुळा नदीकाठच्या निळ्या रेषेतील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गंभीर झाला आहे. चिंचवडमध्ये हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी दिसतील, असा अंदाज आहे.
प्रमुख समस्या
अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे टँकरवर लाखो रुपयांचा खर्च.
प्रशस्त रस्ते असूनही वाहतूक कोंडी.
नदी प्रदूषण.
वाढती अनधिकृत बांधकामे.