चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या उमेदवारीवरून जगताप कुटुंबात वाद नाही असे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्याला आता दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप यांनी पूर्णविराम दिला आहे.
शंकर जगताप म्हणाले की, अश्विनी वहिनींना उमेदवारी आज जाहीर होणार आहे याची कल्पना नव्हती. अन्यथा मी घरी थांबलो असतो. गिरीश महाजन घरी येणार आहेत हे देखील माहीत नव्हते. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला उमेदवारी दिली तरी आम्ही पूर्ण ताकदीने काम करणार होतो. पक्षाचे आभार मानतो कारण आमदार भाऊंच्या जागी वहिनींना आता संधी दिली आहे. असे शंकर जगताप यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, जगताप कुटुंबात उमेदवारीवरून वाद नव्हता. मी २००७ ते १२ नगरसेवक होतो. भाऊंनी निवडणूक लढवण्यास थांबवलं तेव्हा मी थांबलो, हे सर्वांना माहित आहे. राजकारणावरून आमच्या कुटुंबात वाद नव्हता, होणार ही नाही आणि उद्या ही नसणार. माझ्यावर निवडणुकीची जबाबदारी दिलेली आहे. ती मी पार पाडत आहे. मी रणनीती आखलेली आहे. त्या प्रमाणे प्रचार सुरू केला आहे असे देखील त्यांनी सांगितले.