चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अधिकच रंगदार स्थितीत पोहचणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे भाजपाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज आणला असून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या राहुल कलाटे यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे. स्वतः राहुल कलाटे महाविकास आघाडी कडून लढण्यास इच्छुक आहेत. अशी प्रतिक्रिया कलाटे यांनी लोकसत्ता ऑनलाइन ला दिली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकी संदर्भात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि लहान बंधू शंकर जगताप यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने चर्चेला उधाण आहे. भाजपा कोणाला एबी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार करणार हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. अद्याप महाविकास आघाडी वेट अँड वॉच च्या भूमिकेत असून त्यांचा उमेदवार हा शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटे असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> अश्विनी जगताप, शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर!; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
राहुल कलाटे यांनी स्वतः महाविकास आघाडी एकत्र येऊन लढल्यास भाजपाचा पराभव करू शकतो अशी प्रतिक्रिया राहुल कलाटे यांनी लोकसत्ता ऑनलाइन शी बोलताना दिली आहे. २०१९ च्या चिंचवड विधानसभेत निवडणुकीत राहुल कलाटे हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी च्या माध्यमातून राहुल कलाटे हे चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
राहुल कलाटे यांच्याबाबत भाजपाकडून सावध भूमिका..
भाजपाच्या आढावा बैठकीत देखील राहुल कलाटे यांचा पराभव करायचा आहे. एक लाख मतांनी त्यांना पराभूत करायचे आहे. असे आवाहन भाजपा पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांना करत आहेत. हे पहाता राहुल कलाटे च महाविकास आघाडीचे उमेदवार असण्याची शक्यता लक्षात घेऊन भाजपा सावध भूमिका घेताना दिसत आहे.