पिंपरी, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मोजणीला सुरुवात होईल. निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरू होण्याच्या वेळेपर्यंत प्राप्त होणाऱ्या टपाली मतदानाचीच मोजणी करण्यात येणार आहे. चिंचवडचे मैदान कोण मारणार हे सायंकाळी सायंकाळी चार पर्यंत स्पष्ट होईल.
हेही वाचा >>> कात्रजमध्ये लूटमारीस विरोध करणाऱ्या तरुणाचा खून; एकास अटक; अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा
थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे आज मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या एकूण ३७ फेऱ्या होणार आहेत. यासाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार आहेत. १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची संगणकीय प्रणालीने सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात येणार आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या टेबलवरील कामकाज त्या कर्मचाऱ्यांना सोपवले जाणार आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल. मतमोजणीच्या निर्धारित वेळेपर्यंत प्राप्त टपाली मतदानाची मोजणी करण्यात येईल. मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरू होण्याच्या वेळेपर्यंत प्राप्त होणाऱ्या टपाली मतदानाचीच मोजणी करण्यात येणार आहे. टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर १ मतमोजणी पर्यवेक्षक, १ मतमोजणी सहायक आणि १ सूक्ष्म निरीक्षक असे अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.