चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त सुरेंद्रमहाराज धरणीधर देव (वय ६३) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. चिंचवड गावातील मंगलमूर्ती वाडय़ात असलेल्या अभ्यासिकेत सुरेंद्रमहाराज देव यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सुना आणि दोन नाती असा परिवार आहे. श्री मोरया गोसावी यांचे वंशज असलेल्या देव यांना पिंपरी-चिंचवड शहरात आदराचे स्थान होते. काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे शहरातील सार्वजनिक कार्यक्रमांपासून ते अलिप्त होते. श्री मोरया गोसावी यांचा संजीवन समाधी सोहळा काही दिवसांपूर्वी चिंचवड गावात पार पडला. हा सोहळा पार पाडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. शनिवारी (१६ जानेवारी) रात्री त्यांनी जेवण केले. त्यानंतर ते वाडय़ातील खोलीत झोपण्यासाठी गेले.
रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा एक विद्यार्थी त्यांना उठवायला गेला. त्याने दरवाजा वाजविला. मात्र, दार वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्या विद्यार्थ्यांने वाडय़ातील मंगलमूर्तीची पूजा केली. सकाळी नऊ वाजले तरी ते झोपेतून जागे झाले नाही. त्यामुळे त्यांचा मुलगा दर्शन हा त्यांच्या खोलीत गेला आणि त्याने ही दरवाजा वाजविला. काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा सुरेंद्रमहाराज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांचे पार्थिव यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठविण्यात आले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर चिंचवड गावात शोककळा पसरली. महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, शिवसेनेचे गजाजन चिंचवडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात गर्दी केली होती. सुरेंद्रमहाराज यांना सामाजिक कार्याची आवड होती. सन १९९२ मध्ये ते नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यांनी शिक्षणमंडळाचे अध्यक्षपदही भूषविले होते. सन १९९७मध्ये ते पिंपरी महापालिकेत स्वीकृत सभासद म्हणून निवडले गेले होते. सन २००१ मध्ये देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदाचा कार्यभार स्वीकारला. देवस्थानचे काम लोकाभिमुख करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. मोरया गोसावी यांच्या जीवनकार्यावरील मालिका दूरचित्रवाहिनीवर प्रसारित झाली होती. या मालिकेच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. तसेच देवस्थानचे संकेतस्थळ तयार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (१८ जानेवारी) सकाळी नऊ वाजता चिंचवड गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अष्टविनायकांपैकी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक ही मंदिरे चिंचवड देवस्थानच्या अखत्यारित आहेत.
दरम्यान, सुरेंद्रमहाराज यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवालात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यांची पत्नी परगावी गेली आहे. त्यांची मुले आणि निकटवर्तीयांची चौकशी करण्यात आली आहे, असे पिंपरी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मोहन विधाते यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा