पिंपरी चिंचवड : मागील २५ वर्षापासून पिंपरी- चिंचवडकरांसाठी व टपाल कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या चिंचवड पूर्व उप-टपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चिंचवड पोस्टला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी प्राप्त झाला आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व उपटपाल कार्यालय पुणे स्टेशन येथील मुख्य कार्यालयाअंतर्गत जोडली होती. त्यामुळे शहरातील ३५ उप-टपाल कार्यालयांचा कार्यभार पुणे स्टेशन येथील मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेशित करण्यात येत होता. टपाल कार्यालयासाठी लागणारे पैसे पुणे कार्यालयातून पोहोचवले जात होते. त्यात वेळ जात होता. नागरिकांची सर्व काम होत नव्हती. अधिकार मर्यादित होते.
चिंचवड टपाल कार्यालयाला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रीय डाक कर्मचारी संघटन वर्ग ३ चे महाराष्ट्र व गोवा परिक्षेत्राचे सहाय्यक क्षेत्रीय सचिव काळुराम पारखी यांनी अडीच महिन्यांपूर्वी खासदार बारणे यांच्याकडे केली होती.
खासदार बारणे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली.
मावळ लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये सर्व प्रशासकीय कार्यालयांची मुख्यालय सद्यस्थितीत अस्तित्वात येत आहेत. त्यामुळे एक मुख्य टपाल कार्यालय देखील असावे. पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहे. टपाल कार्यालयात लोकांची मोठी कामे असतात. मुख्य टपाल कार्यालय शहरात नसल्याने नागरिकांना पुण्यात जावे लागते. त्यासाठी चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. त्याची तत्काळ दखल घेत मंत्री सिंधिया यांनी मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार चिंचवड पूर्व उप-टपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश झाल्याचा आदेश गुरुवारी प्राप्त झाला आहे.