पिंपरी महापालिकेच्या जानेवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेत जवळपास ३०० कोटी रूपये खर्चाचे प्रस्ताव ऐनवेळी दाखल करून चर्चेविनाच ते मंजूरही करण्यात आले.
चिंचवड केएसबी चौक, भक्ती शक्ती ते मुक्ताई आणि सांगवी फाटा येथे उड्डाणपुलास मंजुरी देतानाच नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपुलास भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांचे नाव देण्यास सभेने मान्यता दिली आहे.
कासारवाडी-नाशिकफाटा येथील दुमजली उड्डाणपुलाला जेआरडी टाटांचे नाव देण्याचा प्रस्तावही या वेळी मंजूर करण्यात आला. या पुलाला विशिष्ट नाव द्यावे, अशी मागणी असणारी असंख्य निवेदने पालिकेकडे जमा झाली होती. शिवसेनेने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची आग्रही मागणी केली होती. तथापि, अजितदादांच्या सूचनेनुसार टाटा यांचे नाव देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. याशिवाय, उड्डाणपुलांचे प्रस्तावही मान्य करण्यात आले. कंपन्यांचा परिसर व पाच मोठे रस्ते एकत्र येत असलेल्या चिंचवडच्या केएसबी चौकातील उड्डाणपुलासाठी ९८ कोटी रूपये मंजूर केले आहेत. यासंदर्भात क्रिसिल संस्थेने सव्र्हेक्षण केले होते, त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार उड्डाणपूल उभारण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह ते मुक्ताई या ४५ मीटरच्या रस्त्यावर निसर्ग दर्शन सोसायटीजवळ उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलासाठी ७४ कोटी रूपये खर्चास मान्यता देण्यात आली. शहरातील बीआरटीएस मार्गावरील स्थापत्य कामासाठी ४८ कोटी रु.खर्चास मान्यता देण्यात आली. सांगवी-किवळे मार्गावर सांगवी फाटय़ाजवळ उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटरसाठी ५४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले.

Story img Loader