गेल्या काही दिवसांपासून राज्यात कसबा पेठ आणि चिंचवड इथल्या विधानसभा पोटनिवडणुकीवर राजकीय वातावरण तापल्याचं दिसत आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा आयोगाने काही दिवसांपूर्वी केली होती. ही निवडणूक बिनविरोध केली जावी, यासंदर्भात राजकीय चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत होताना दिसत नाही.त्यातच आता निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण घोषणा केली असून कसबापेठ आणि चिंचवडमधील पोटनिवडणुकांच्या तारखांमध्ये आयोगाने बदल केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत्या आधीच्या तारखा?

निवडणूक आयोगाने याआधी १८ जानेवारी रोजी केलेल्या घोषणेनुसार अरुणाचल प्रदेश, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील काही जागांवर २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर २ मार्च रोजी मतमोजणीची तारीखही निश्चित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रातील १२वीच्या परीक्षा आणि मतदानाच्या तारखा एकाच काळात येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आयोगाने मतदानाच्या तारखांमध्ये बदल केला आहे.

काय आहे निवडणुकीचं नवीन वेळापत्रक?

आयोगाने यासंदर्भात परिपत्रक काढून घोषणा केली आहे. या पत्रकानुसार, महाराष्ट्रातील चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकांसाटी ३१ जानेवारी रोजी अधिसूचना काढली जाईल. त्यानंतर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ७ फेब्रुवारी असेल. ८ फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी केली जाईल. १० फेब्रुवारी ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होईल.

चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखेत बदल!

यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार २ मार्च रोजी इतर राज्यांमधील पोटनिवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील या दोन मतदारसंघांमध्येही मतमोजणी केली जाईल. आयोगाच्या पत्रकानुसार ४ मार्चपूर्वी मतदानाची सर्व प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असेल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinchwad kasba peth by election dates change election commission declared pmw