कोटय़वधी रुपये खर्च करून पिंपरी महापालिकेने अनेक मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारले, देखभाल व दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्चाची व्यवस्था करून ठेवली. मात्र, या प्रकल्पांमध्ये प्रक्रिया करण्यात आलेले मोठय़ा प्रमाणातील पाणी पुन्हा दूषित अशा नदीपात्रातच सोडण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. मागणी होत नसल्याने हे पाणी नदीत सोडले जात असल्याचे कारण पालिकेकडून दिले जात आहे.
पिंपरी पालिकेने शहरभरात १३ मैलाशुद्धीकरण प्रकल्प उभारले आहेत, सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करण्यात येते. हे पाणी शेती, बांधकाम, कारखाने, उद्याने तसेच पिण्याव्यतिरिक्तच्या कामांसाठी वापरता येणे शक्य आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होऊ शकते. मात्र, तसे होताना दिसत नाही. प्रक्रिया करण्यात आलेले पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येते, अशी माहिती पुढे आली आहे. शहरातील नदीपात्राची सध्याची अवस्था पाहता तेथे पाणी सोडण्यात आल्यानंतर ते दूषितच होणार, याविषयी कोणाचेही दुमत नाही. त्यामुळे यासाठी खर्च केलेला कोटय़वधी रुपयांचा खर्च ‘पाण्यात’ जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पाण्याचा योग्य ठिकाणी वापर करण्याचे ठोस नियोजन महापालिकेकडे नाही, असे यानिमित्ताने उघड झाले आहे. यासंदर्भात, पालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी उपअभियंता मनोहर जावराणी यांच्यामार्फत प्रतिक्रिया दिली आहे. प्रकल्पातून प्रक्रिया झालेले पाणी पुन्हा नदीत सोडण्यात येते, अशी कबुली त्यांनी दिली. िपपरी-चिंचवडच्या कार्यक्षेत्रात औद्योगिक विकास महामंडळ व अन्य संस्था आहेत. स्टेडियमच्या विविध कामांसाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो. मात्र, त्यांच्याकडून मागणी होत नाही, असे ते म्हणाले.

Story img Loader