पिंपरी : चिंचवड स्टेशन लोहमार्गावरील पुलाचा उताराकडील काही भाग कोसळल्याने हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. चिंचवड स्टेशन येथून गावात जाणारी हलकी वाहतूक बाजूच्या पुलावरून वळविली आहे. एकच पूल सुरू असल्याने चिंचवड स्टेशन येथील वाहतूककोंडीत भर पडत आहे.चिंचवड स्टेशन ते चिंचवडगाव मार्गावर वर्दळ असते. या पुलामुळे मुंबई-पुणे आणि मुंबई-बंगळुरू महामार्ग जोडले गेले आहेत. लोहमार्गाच्या पूर्व व पश्चिमेकडील नागरी व औद्योगिक पट्टाही जोडला आहे. त्यावर चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावर जुळे उड्डाणपूल आहेत.

एक जुना असून, एक नवा आहे. जुना पूल चिंचवडगावाकडे तर, नवा पूल मुंबई-पुणे महामार्गाकडे जातो. मात्र, जुन्या पुलाच्या क्षमतेबाबत रेल्वे खात्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेला दोन वर्षांपूर्वी पत्र पाठवले होते. पुलाचा काही भाग जीर्ण झाल्याची बाब पत्रात नमूद आहे. त्यावर वर्षभरापूर्वी महापालिकेने डागडुजी, दुरुस्ती व डांबरीकरणाचे काम केले. त्यानंतर तो वाहतुकीसाठी खुला केला. अवजड वाहनांना प्रवेश बंदी होती. केवळ दुचाकी, तीन चाकी, चारचाकी (हलकी) वाहनांना प्रवेश सुरू होता. आता पुन्हा पुलाचा काही भाग कोसळल्याने तो वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. चिंचवड स्टेशन येथून गावात जाणारी हलकी वाहतूक बाजूच्या पुलावरून वळविली आहे.

दोन दिवसांपूर्वी उड्डाणपुलाच्या चिंचवडगावाकडील उतराच्या मार्गाचा काही भाग कोसळल्याचे रेल्वे विभागाने महापालिकेला कळविले. त्यानंतर महापालिका स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत पुलाची पाहणी केली. त्यावर तातडीने दुरुस्ती सुरू करावी, काम पूर्ण होईपर्यंत जुन्या पुलावरील वाहतूक बंद ठेवावी, अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांनी केल्या. त्यावर महापालिका अधिकाऱ्यांनी वाहतूक वळवून दुरुस्तीचे काम हाती घेतले.

अवजड वाहनांमुळे कोंडी

लोहमार्गावरील उड्डाणपुलाची दुरुस्ती सुरू केल्यामुळे वाहतूक वळवण्यात आली आहे. चिंचवड चौकातून गावात जाणारी आणि तिकडून पुणे-मुंबई महामार्गावर येणारी दोन्ही बाजूंची वाहने एकाच मार्गावर आल्याने कोंडी होत आहे. चिंचवडगावातून जड, अवजड वाहने येत असल्यामुळे पुलावरील कोंडीत भर पडत आहे.

चिंचवड स्टेशन लोहमार्गावरील उड्डाणपुलाचा काही भाग जीर्ण झाला आहे. तेथे दुरुस्ती केली जात आहे. या कामावर ताण येऊ नये, म्हणून पुलावरील वाहतूक बंद केली आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता प्रेरणा सिनकर यांनी सांगितले.