चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर याच निवडणुकीत शिवसेनेचे स्थानिक बंडखोर प्रभावी नेते राहुल कलाटे यांनीही ही निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्धार केला आहे. यामुळे महाविकास आघाडीसमोर अडचण निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. ही अडचण सोडवण्याच्यादृष्टी राहुल कलाटेंच्या मनधरणीसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवारी दाखल करण्यावर ठाम आहेत. माझ्याबरोबर शिवसैनिक आहेत, असं म्हणत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राहुल कलाटे यांनी डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. यावेळी आपण नेमकं स्वत:ला कुणाचे उमेदवार मानता अशी विचारणा त्यांना एबीपी माझा कडून करण्यात आल्यावर त्यांनी सांगितले की, “मी महापालिकेत शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करतो आहे आणि मी शिवसेनचा नगरेसवक आहे. परंतु मी महाविकास आघाडीकडे उमेदवारी मागितली होती. मला असं वाटत होतं की महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी विचार केला जाईल. कारण, २०१९ मध्ये मी शिवसेना बंडखोर म्हणून अपक्ष निवडणूक लढवली होती. मला चिंचवडच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं होतं. मला १ लाख १२ हजारांच्या वर मतं दिली होती. तो एक माझ्यावर दाखवलेला खूप मोठा विश्वास होता.”
याशिवाय, आता शिवसेनेचे लोक काय भूमिका घेतील असं तुम्हाला वाटतं? कारण, आज नाना काटे यांचा उमेदवारा अर्ज दाखल करताना तिथे शिवसेनेचे स्थानिक नेते आहेत. यावर राहुल कलाटे यांनी शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत. असं म्हणत उत्तर दिलं.
राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी राहुल कलाटे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना यश आले नसल्याचे दिसत आहे.