पिंपरी : विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केल्याने महाविकास आघाडीत चिंचवडची जागा शिवसेनेला सुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे पिंपरी आणि भोसरीतील शिवसेनेतील इच्छुकांनी चिंचवडची पडणारी जागा नको, आयात उमेदवाराचे काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. भोंडवे यांच्या प्रवेशामुळे कोंडी झालेले शिवसेनेचे (ठाकरे) पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

शहरात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) हे दोन्ही पक्ष पिंपरी आणि भोसरीच्या जागेसाठी आग्रही आहेत. दोन्ही पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. पिंपरीतून शिवसेनेचे (ठाकरे) जिल्हाप्रमुख, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख सचिन भोसले, राष्ट्रवादीकडून माजी नगरसेविका सुलक्षणा धर इच्छुक आहेत. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले अजित गव्हाणे यांनी भोसरीत प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपमधून शिवसेनेत (ठाकरे) आलेले माजी नगरसेवक रवी लांडगे, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे हेही भोसरीतून इच्छुक आहेत.

हेही वाचा : पिंपरी : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसवर कारवाईचा दंडुका

पिंपरी आणि भोसरीच्या जागेवरून दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. भोंडवे विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असून राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भाजपचे नाराज माजी नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा त्यांचा दावा आहे. महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नव्हता. त्यामुळे भोंडवे यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याचे सांगितले जाते. परंतु, चिंचवड मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असून बालेकिल्ला मानला जातो. तीनवेळा भाजपच्या चिन्हावर लढलेला उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे चिंचवडची पडेल जागा पक्षाला नको अशी भूमिका शिवसेना (ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. चिंचवडपेक्षा पिंपरी, भोसरीत पक्षाचे संघटन आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांवरील दावा सोडण्यास पदाधिकाऱ्यांनी नकार दिला. भोंडवे यांच्या प्रवेशामुळे कोंडी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी आयात उमेदवाराचे काम करणार नसल्याचा ठरावही केला आहे.

हेही वाचा : पिंपरी : जगताप कुटुंबातील गृहकलह संपुष्टात? आमदार अश्विनी जगताप यांनी घेतली ‘ही’ भूमिका

याबाबत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, की कोणालाही विश्वासात न घेता भोंडवे यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. संघटना वाढीसाठी पक्षात येणाऱ्यांचे स्वागत करतो. परंतु, उमेदवारीसाठी प्रवेश करत असेल तर आम्ही त्या व्यक्तीचे काम करणार नाही. निवडून येण्याची शक्यता कमी असलेली चिंचवडची जागा आम्ही मागितली नाही. चिंचवडची जागा नको आहे, पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा.