पिंपरी पालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या जनसंवाद सभा उपक्रमाअंतर्गत चिंचवड येथील कार्यक्रमात गोंधळ झाला. काही कार्यकर्त्यांनी तक्रारअर्ज तसेच निवेदने फाडून अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकली. त्याचप्रमाणे सभेच्या ठिकाणीच ठिय्या आंदोलनही केले.

पालिकेच्या प्रशासकीय राजवटीत नागरिकांना तक्रारींसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून प्रशासनाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयनिहाय जनसंवाद सभा आयोजित केल्या जातात. गेल्या दोन आठवड्यापासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मात्र, जनसंवाद सभेच्या नावाखाली फार्स केला जात आहे. यापूर्वीच्या दोन सभांमध्ये मांडण्यात आलेल्या तक्रारी कायम आहेत, असा आरोप करत चिंचवडच्या सोमवारी (४ एप्रिल) झालेल्या जनसंवाद सभेत काही कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मधुकर बच्चे, संजय गायके, हरेश नखाते, गणेश बाबर, राजू भालेराव, कविता दळवी आदींचा आंदोलनात सहभाग होता.

सभा जाहीर घेण्याची मागणी

यासंदर्भात मधुकर बच्चे म्हणाले की, ब प्रभागातील पहिली जनसंवाद सभा खुल्या स्वरूपात झाली. मात्र, दुसऱ्या सभेच्या वेळी बंद खोलीत एकेका नागरिकाला आत बोलावून घेण्यात आले. या पद्धतीने बराच वेळ जातो. नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागते. सोमवारी त्याच पद्धतीने छोट्या केबिनमध्ये बोलावून नागरिकांची निवेदने स्वीकारण्यास सुरुवात झाली. त्यास उपस्थित नागरिकांनी कडाडून विरोध केला. जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करण्यात आले. तेव्हा प्रशासनाने सुरक्षा रक्षकांना पाचारण केले. पालिकेच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ निवेदने फाडून अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकण्यात आली. यापुढील जनसंवाद सभा जाहीर स्वरूपात घ्यावी, अशी मागणी केली आहे.

दरम्यान, या संदर्भात प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Story img Loader