लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : आठवीत असल्यापासून पोस्टर्स पाहून भारतीय सैन्यात भरती होण्याची आवड निर्माण झाली. तेच ध्येय मनाशी बांधून सैन्यात भारती होण्याचे सातत्याने प्रयत्न केले. एनडीए येथे निवड होण्यासाठी तीन वेळेस लेखी परीक्षा दिली. परंतु, मुलाखतीमध्ये निवड झाली नाही अशा परिस्थितीतून स्वत:चा आत्मविश्वास ढळू न देता पुन्हा जोमाने अभ्यास करत एनसीसी कोट्यातून परीक्षा दिली. आणि लेफ्टनंट पदी निवड झाली, हे कौतुकास्पद यश आहे पिंपळे गुरव येथील चिंतामण बुरसे याचे…

देशसेवेसाठी लहानपणापासून भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगत वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी निवड झालेल्या पिंपळे गुरव येथील चिंतामण विष्णू बुरसे यांचा महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, चिंतामण बुरसे यांचे वडील विष्णू बुरसे,आई स्वाती बुरसे, विद्युत विभागातील प्रशांत जोशी हे उपस्थित होते. ‘पिंपरी-चिंचवड शहरातील देशसेवेत सहभागी होणा-या युवकांमुळे शहराच्या लौकिकात भर पडली असून अशा युवकांचा अभिमान वाटत असल्याचे’मत अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी व्यक्त केले.

चिंतामणला आठवीत असल्यापासून भारतीय सैन्याचे पोस्टर्स पाहून भारतीय सैन्यात भरती होण्याची आवड निर्माण झाली. तेच ध्येय मनाशी बांधून त्याने सैन्यात भारती होण्याचे सातत्याने प्रयत्न केले. एनडीए येथे निवड होण्यासाठी तीन वेळेस लेखी परीक्षा दिली. परंतु मुलाखतीमध्ये निवड झाली नाही अशा परिस्थितीतून स्वत:चा आत्मविश्वास ढळू न देता चिंतामणने पुन्हा जोमाने अभ्यास करत एनसीसी कोट्यातून परीक्षा दिली. त्यामध्ये त्याची लेफ्टनंट पदी निवड झाली.चेन्नई येथे ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी येथे त्यांनी तीन महिन्यांचे खडतर प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे. लवकरच ते ग्वाल्हेर येथे भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट म्हणून ते रुजू होणार आहे.

‘आपले लक्ष्य समोर ठेऊन आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अपयशाचा जिद्दीने सामना करा. ध्येय सोडू नका मेहनतीने यश निश्चित काबीज करा. मी देखील लहानपणापासून सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. ते आज पूर्ण झाले’, असे लेफ्टनंट चिंतामण बुरसे म्हणाला. ‘चिंतामणला लहानपणापासून सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. आम्ही देखील कायम त्याला पाठींबा दिला. अनेकदा अपयश येऊन देखील त्याने मेहनतीने त्यांचा सामना करत आपले स्वप्न पूर्ण केले’, असे त्याची आई स्वाती बुरसे यांनी सांगितले.

पाल्यांच्या आयुष्यात पालकांची भूमिका महत्वाची…

प्रत्येक पाल्यांच्या आयुष्यात पालकांची भूमिका महत्वाची असते. लेफ्टनंट पदी निवड झालेल्या चिंतामण यांचे वडील विष्णू बुरसे हे पुण्यातील एका कंपनीत लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. तर आई स्वाती बुरसे या पिंपळे गुरव येथे शिकवणी वर्ग चालवतात. तरी देखील त्यांनी कायम चिंतामणला त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. भरतीमधील अपयशानंतर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आपल्या मुलांना डॉक्टर व इंजिनीअर बनविण्याच्या मागे नं लागता लहानपणापासून आपल्या मुलाला त्यांनी देशसेवा करण्यासाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न दाखवले म्हणून चिंतामण हे मोठे यश मिळवू शकला.

Story img Loader