पुणे : मुळा-मुठा नदीकाठ संवर्धन, पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरण योजनेअंतर्गत नदीकाठ परिसरातील सहा हजार वृक्षांची तोड होणार असल्याच्या निषेधार्थ पर्यावरणप्रेमी संस्था, संघटना आणि नागरिकांच्या वतीने शनिवारी ‘चिपको आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उत्स्फूर्तपणे सामील झाले.
जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यान ते डेक्कन जिमखाना पीएमपी बस थांब्यापासून नदी काठच्या रस्त्याने गरवारे पुलापर्यंत फेरी काढण्यात आली. नदीकाठ परिसरातील वृक्षांना आिलगन देऊन झाडे तोडू नका, असे आवाहन आंदोलकांनी घातली. नदीकाठ सुधार योजनेनुसार अनेक झाडे तोडली जाणार आहेत. वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावावरील वृक्षांची संख्या आणि प्रत्यक्षात तोड केल्या जाणाऱ्या झाडांची संख्या यात तफावत आहे. नदीकाठची परिसंस्था यामुळे धोक्यात येणार आहे, असे काही आक्षेप पर्यावरणप्रेमींनी घेतले आहेत.
काय घडले?
पुणे महापालिकेने हाती घेतलेल्या नदीसुधार प्रकल्पामुळे वृक्षसंपदेची हानी होणार असून ही योजना राबवण्यासाठी झाडांचीही कत्तल करण्यात येणार असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आक्षेप आहे. त्यामुळे महापालिकेच्या या योजनेविरोधात पर्यावरणप्रेमी नागरिक एकत्र आले आणि त्यांनी चिपको आंदोलन केले. वेताळ टेकडीवर प्रस्तावित केलेल्या बालभारती-पौड फाटा रस्त्यालाही पुण्यातील पर्यावरणप्रेमींचा विरोध आहे.