विद्याधर कुलकर्णी, पुणे
खमंग बाकरवडी आणि तोंडात टाकल्यानंतर विरघळणारी आंबा बर्फी म्हटलं की पटकन ओठांवर चितळे बंधू मिठाईवाले यांचेच नाव येते. टाळेबंदीतून सवलत मिळाल्यानंतर ‘चितळे बंधू मिठाईवाले’ची सर्व दुकाने आणि त्यांची उत्पादने मिळणारी दुकाने ९ मेपासून पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली. पहिल्या दिवशी बाकरवडी, लोणी, तूप, श्रीखंड, इन्संट मिक्सेस हे पदार्थ पुणेकरांना घेता आले. खेड शिवापूर येथील चितळे कारखान्यामध्ये बाकरवडीची निर्मिती होत असल्याने पहिल्याच दिवशी पुणेकरांना बाकरवडी मिळू शकली. या कारखान्यामध्ये आंबा बर्फी व सोनपापडी बनविणे सुरू केले आहे. मात्र, गुलटेकडीचा मिठाई कारखाना प्रतिबंधित क्षेत्रात असल्यामुळे पुणेकरांना मिठाई मिळू शकली नाही. टाळेबंदी सुरू होण्यापूर्वी गुढी पाडव्याची तयारी सुरू होती. कारखान्यामध्ये तयार केलेल्या मिठाई, बर्फी, पेढे या तयार मालांसह मैदा आणि मिठाई बनविण्याचा कच्चा माल अशा सर्व गोष्टींचे किती नुकसान झाले असावे, याची अद्याप गणती केली नाही, असे श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले. आता दुकाने सुरू झाली आहेत. गाडी रुळांवर येण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
दुकाने सुरू झाल्यानंतर ग्राहकांना सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुखपट्टी आणि हातमोजे देण्यात आले असून काम सुरू करण्यापूर्वी त्यांचा पल्स रेट पाहिला जातो. ग्राहकांच्या शरीराचे तापमान यंत्राद्वारे पाहणे, हाताच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायझर हे उपाय सुरू आहेतच. बाकरवडी, आंबा बर्फीसह सध्या उपलब्ध असलेली मिठाई यंत्राद्वारे बनविली जात असून त्यामध्ये कोणाचेही हात लागत नाहीत. आमच्याकडे परप्रांतीय कर्मचारी नसल्यामुळे टाळेबंदीमध्ये कर्मचारी घराकडे परतल्याचा फटका बसलेला नाही, असे चितळे यांनी सांगितले.