राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे माणसांच्याच नव्हे, तर पक्ष्यांच्याही जीवनावर परिणाम झाला आहे.
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलावातील सर्वात मोठे चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगार यंदा दुष्काळामुळे ओस पडले आहे. दरवर्षी मोठय़ा संख्येने येणाऱ्या परदेशी पक्ष्यांनी पाठ फिरविल्याने प्रथमच ही स्थिती निर्माण झाली आहे.
उजनी धरणाची निर्मिती झाल्यानंतर गेल्या पस्तीस वर्षांपासून इंदापूर तालुक्यात युरोप खंडातून अनेक स्थलांतरित पक्षी काही काळ वास्तव्यास येऊ लागले. त्यामधे चित्रबलाक व रोहित पक्ष्यांची संख्या मोठी होती. सुरुवातीला या पक्ष्यांनी इंदापूर येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील झाडांवर विणीच्या हंगामासाठी सारंगार वसविले. त्यानंतर दरवर्षी येथे पक्ष्यांची संख्या वाढू लागली.
हे ठिकाण अपूरे पडू लागल्याने मागील पंधरा वर्षांपासून भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन विस्तीर्ण तलावातील झाडांवर सुरक्षित ठिकाणी हजारोंच्या संख्येने हे पक्षी येऊन सारंगार थाटले गेले.
या सारंगाराची माहिती वृत्तपत्रातून येताच आजवर शेकडो पक्षी निरीक्षकांनी या वसाहतीला भेट दिली आहे. सुमारे चाळीस ते पन्नास एकर परिसरातील तलावातील झाडावर थाटलेले हे चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगार देशातील सर्वात मोठे ठरले आहे. मात्र गेले तीन चार वष्रे पाऊस कमी झाल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही. परिणामी येथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी झाली.
सद्य:स्थिीत या तलावात पाणी नसल्याने चित्रबलाक पक्ष्यांनी या तलावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पंधरा वर्षांच्या कालावधीत देशातील सर्वात मोठे ठरलेले हे सारंगार आज ओस पडले आहे. पाण्याअभावी वठून गेलेल्या काटेरी झाडांवर आज तेथे या पक्ष्यांची केवळ विस्कटलेली घरटीच पाहण्यास मिळत आहेत.