भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे नेते रघुनात कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुचिक यांनी एका तरुणीवर बलात्कार करुन तिला गर्भपात करायला लावला. त्यानंतरही कुचिक यांना जामीन देण्यात आला असून ते या तरुणीवर तक्रार मागे घेण्यासाठी दाबाव आणत आहेत असं चित्रा वाघ यांनी स्वत:च्या फेसबुक प्रोफाइलवरुन पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत म्हटलं आहे. या तरुणीने फेसबुकवर आपण स्वत:ला संपवत असल्याची पोस्ट केली असून ती मुलगी बेपत्ता आहे असा दावाही चित्रा वाघ यांनी केलाय. आपण पुण्याचे पोलीस आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि गृहमंत्र्यांना यासंदर्भात वारंवार फोन करुनही त्यांनी आपल्याला उत्तर दिलेलं नाही. या तरुणीच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला कुचिक यांच्याबरोबरच पुणे पोलीस आणि राज्य सरकारची असेल असंही चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
“मी चित्रा वाघ अतिशय व्यथित होऊन हा व्हिडीओ करतेय. शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक ज्याला राज्यमंत्र्याचा दर्जाही देण्यात आलाय. या हरामखोराने एका मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात केला. याच्याबद्दल समोर येऊन तिने या सर्व गोष्टी सांगितल्या. एवढ्या पुराव्यानंतरही त्याला कसा जमीन मिळाला माहिती नाही. दोनदा जामीन मिळालाय. सध्या तो बाहेर आहे. तो त्या मुलीवर दबाव आणतोय. ही केस मागे घे म्हणून तिला मेसेजेस करतोय. हे मेसेज कुणाला दाखवायेच ते दाखव मला काही फरक पडत नाही अशापद्धतीची त्याची भूमिका आहे. त्याच्या मागे त्याचा कर्ता करविता, बोलविता धनी कोण आहे?,” असा प्रश्न व्हिडीओमध्ये चित्रा वाघ यांनी विचारलाय.
काल सायंकाळी पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये चित्रा वाघ यांनी, “आता एक दीड तासापूर्वी एक फेसबुकवर पोस्ट टाकली त्यात ती म्हणतेय की मी स्वत:ला संपवतेय. तिने जर काही जीवाचं बरं वाईट केलं आणि त्यात ती मुलगी मेली तर त्याची सगळी त्या कुचिकची तर आहेच पण या पुण्याचे पोलीस आणि राज्य सरकारची पण असेल. तिने केलेल्या सर्व पोस्ट मी आता पुण्याच्या सीपींना पाठवल्या, जॉइण्ट सीपींना पाठवल्या, गृहमंत्र्यांना पाठवल्या. कित्तेक फोन मी तिघांना केले एकानेही फोन उचलला नाही. माझे मेसेजेस पाहिले त्याला रिप्लाय सुद्धा दिलेला नाही. मला कळकळीची विनंती करायची आहे की वाचवा तिला वाचवा. ती मेल्यानंतर तुम्ही मोर्चे कराल, आंदोलने कराल, काळ्या फिती लावून फिराल, मेणबत्त्या घेऊन फिराल त्याला काही अर्थ राहणार नाही. जिवंती मुलगीय तिला वाचवा. हात जोडून विनंती करतेय मी. कुठे गेले सगळे कमिशन? झोपलेत का सगळे?,” असा संतप्त सवालही त्यांनी विचारलाय.
“आता जर तिच्या जिवाचं बरं वाईट झालं तर ही सगळी जबाबदारी सरकारची असणार आहे. महिला धोरण आणि हे सगळे ठकोसले बंद करा. जिवंत हाडामांसाची मुलगी तिथे येते तिला जर न्याय देण्याचं काम तुम्ही करु शकत नसाल तर तुम्हाला तिथे बसण्याचा काही अधिकार तुम्हाला नाही. लक्षात ठेवा पुण्याचे कमिश्नर साहेब कित्तेक फोन मी तुम्हाला केले. जॉइण्ट सीपीसाहेब, गृहमंत्र्यांनाही कित्तेक फोन केले. एकाने सुद्धा रिप्लाय दिला नाही. तुमच्या लेकी महिलांची किंमत काय आहे हे महाराष्ट्राने बघितलंय. मेल्यानंतर सगळे एकत्र येतील पण जिवंत मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न करत नाहीत हे फार दुख:द आहे. हे मी फार व्यथित होऊन बोलतेय. पुन्हा एकदा हात जोडून विनंती करते त्या मुलीला वाचवा. कृपया त्या मुलीचा जीव वाचवा,” असंही त्या म्हणाल्या आहेत.
चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो पोस्ट करत, “हिची पूजा चव्हाण होऊ देऊ नका मुख्यमंत्री महोदय. आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या कुचिकवर तात्काळ ३०७ चा गुन्हा दाखल करा,” अशी मागणीही केलीय.
या प्रकरणामध्ये अद्याप शिवसेनेनं काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीय.