राज्यात महिलांवर व लहान मुलींवर मोठ्याप्रमाणावर होणारे अत्याचार , या विषयावर भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलताना महाविकासआघआडी सरकारवर जोरदार टीका केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, “राज्यात महिलांवरी अत्याचाराच्या घटनांनी मागील दोन वर्षांमध्ये उच्चांक गाठला आहे, असं म्हटल तर वावगं ठरणार नाही. लहान मुली, शाळकरी मुलींवर अत्याचार होत आहेत आणि पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे आपल्याला दिसत आहे. पुणे हे विद्येचं माहेर घर असं म्हटलं जातं. पण आता ते अत्याचाराचं माहेर घर झालं आहे का? पुणे तिथे काय उणे असं म्हणातात, तर इथे ज्या घटना घडत आहेत जे अत्याचार घडत आहेत ते देखील उणे नाहीत. रोजच घडत आहेत कुठे ना कुठे रोज चालंलय. हा विषय केवळ पुण्यापुरता मर्यादित नाही संपूर्ण महाराष्ट्राबद्दल आपण बोलणार आहोत. परंतु पुण्यात आज सावित्रीमायींच्या या भूमीत पत्रकारपरिषद घेत असताना याचा उहापोह करणं तेवढंच जास्त गरजेचं आहे.”

तसेच, “आपण बघतो आहोत की राज्यात रोज बलात्कार होत आहेत. विनयभंग, सामहिक बलात्कार होत आहेत. एवढच नाही तर एखादा नामचीन गुंडा हा तुरुंगातून बाहेर येतो आणि मोठ्या जोशात मिरवणुक काढतो, त्याची हिंमत बघा किती होते. एवढच नाही तर तो दणक्यात वाढदिवस साजरा करण्याची देखील हिंमत दाखवतो. हे चांगल्या समजासाठी तर वाईट आहेच. पण त्याही पेक्षा सरकारच्या अस्तित्वहीनतेचा हा पुरावा आहे. की कुणालाच त्याची भीती वाटत नाही.” असंही चित्रा वाघ यांनी सांगितलं.

याचबरोबर, “मला तर आश्चर्य वाटतं की लोकांनी आम्हाला निवडून दिलंय अशा पद्धतीचे वक्तव्य या तिन्ही पक्षाचे नेते व्यासपीठावर करत असतात. खरंतर लोकांनी यांना जनादेश दिलेला नाहीच आहे. हे तडजोडीचं सरकार आहे, हे जुगाडू सरकार आहे. जुगाड करून तिघेजण एकत्र बसले आणि या तडजोडीच्या सरकारमध्ये दोन वर्षात कशापद्धतीने शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक असा कुठला घटक नाही ज्याची माती यांनी केलेली नाही. आतापर्यंत अनेक सरकार आले अनेक गेले, परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची एवढी वाईट अवस्था आम्ही आजपर्यंत पाहिलेली नव्हती. सत्ताधारीच जर राज्यातील महिलांना सुरक्षा पुरवत नसतील, तर त्या सत्तेला काय अर्थ आहे? आज महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या दोन वर्षात महाराष्ट्राने काय नाही पाहिलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत एक जिल्हा असा नाही, ज्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या नाही.” अशी टीका यावेळी चित्रा वाघ यांनी केली.

Story img Loader