राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणता आला नाही. राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे शिवसेनेचे संजय पवार यांचा भाजपाचे धनंजय महाडिक यांनी पराभव केला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे.
या निवडणुकीत भाजपाने यशस्वी खेळी करत निवडणूक जिंकली आहे. या विजयाचे श्रेय सर्वच भाजपा नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. महाविकास आघाडीसोबत असलेल्या काही आमदारांना फोडण्यात भाजपाला यश आले आहे. भाजपाला १०६ मतांशिवाय अतिरिक्त १७ मते मिळाली आहेत. निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढवली होती असे म्हटले आहे. या विजयानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
अकेला देवेंद्र क्या करेगा असं विचारणाऱ्यांना दणदणीत उत्तर मिळाल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या. “भाजपाला अतिशय शानदार असा विजय देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मिळाला आहे. आमचे दोन उमेदवार निवडून येणार होतेच. पण पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की आमचा तिसरा उमेदवारही निवडून येणार. हा चमत्कार आमच्या नेत्यांनी केली आहे. भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर हे आमच्या विजयाने दिले आहे,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.