पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण अजूनही तापलेलंच असताना आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात सरकारला आणि पोलिसांना देखील परखड सवाल केले आहेत. चित्रा वाघ यांनी या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. याआधी चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणने आत्महत्या केली, त्या घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन घटनास्थळाची देखील पाहणी केली. ‘पूजाच्या मृत्यूनंतर सकाळी ७ ते ७.३०च्या दरम्यान इथल्या लोकांनी १०० क्रमांकावर पुणे पोलीस कंट्रोल रुमला फोन करून घटनेची सगळी माहिती सांगितली होती. ते घटनास्थळावरचे प्रत्यक्षदर्शी होते. पोलिसांनी तो फोनकॉल जाहीर करावा’, असं आव्हान चित्रा वाघ यांनी केलं आहे.
“१७ दिवसांनंतरही FIR का नाही?”
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपनं सत्ताधारी शिवसेना आणि राज्य सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली आहे. यामध्ये बुधवारी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी १४ प्रश्न राज्य सरकारला विचारल्यानंतर आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. वानवडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विचारणा केली असता तिथल्या पोलिसांनी उडवाउडवीची आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. ‘तिथले वरीष्ठ पोलीस निरीक्षक लगड यांनी मला सांगितलं की पूजाच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केलेली नाही. आम्हाला वरीष्ठांकडून लेखी आदेश न आल्यामुळे आम्ही तक्रार दाखल केली नाही. पोलिसांना FIR दाखल करण्यासाठी कोणाचे आदेश हवे आहेत? घटनेच्या १७ दिवसांनंतर देखील एफआयआर दाखल का केली जात नाही?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
Pooja Chavan: “लाज वाटली पाहिजे तुम्हाला…,” पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या चित्रा वाघ संतापल्या
अधिवेशनात मुद्दा वाजणार
दरम्यान, यावेळी पूजा चव्हाण प्रकरण विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजणार असल्याचं दिसून येत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून रान पेटवलेलं असताना आज चित्रा वाघ यांनी देखील अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचं सांगितलं आहे. “अधिवेशनात भाजपा सीनियर पीआय लगडचा मुद्दा लावून धरणार आहे. हत्यारा संजय राठोडसाठी तुम्ही तुमचं सर्वस्व पणाला लावणार आहात का?” असं त्या म्हणाल्या.
‘त्या’ डॉक्टरने ट्रीटमेंट दिलीच नाही?
“पूजा चव्हाणचा गर्भपात झाला, त्या दिवशी यवतमाळच्या त्या रुग्णालयात ड्युटीवर एक डॉक्टर होते. मात्र, त्यांच्या जागी त्या वेळी दुसरेच डॉक्टर आले आणि त्यांनी पूजा चव्हाणला गर्भपाताची ट्रीटमेंट दिली”, असा दावा चित्रा वाघ यांनी यावेळी केला.
“पोलीस म्हणतात, आई-वडिलांची तक्रार नाही म्हणून एफआयआर नाही. १२ ऑडिओ क्लिप्समध्ये आत्महत्येला प्रवृत्त करण्यापासून आत्महत्येनंतर दरवाजा तोड पण मोबाईल ताब्यात घे इथपर्यंतचं बोलणं आहे. हे सगळे फोन अरुण राठोडच्या फोनवर आले होते. हा अरुण राठोड मुलीसोबत राहात होता. तो ही माहिती कुणाला देत होता? शेवटच्या क्लिपमध्ये संजय राठोड लाईनवर होता. तो अरुण राठोडला बाहेर यायला सांगत होता”, असा आरोप देखील चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.