“शिवसेनेचा नेता रघुनाथ कुचिक याच्यावर पीडित तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन जवळपास महिनाभर होत आला. पण त्याच्यावर कोणत्याही प्रकाराची कारवाई होत नाही. तसेच राज्यमंत्री पदाचा दर्जा देखील कायम आहे. यातून या सरकारची मानसिकता दिसून येत आहे. त्यामुळे आम्ही अखेर पर्यंत लढा उभारणार आहोत. आमचा कोणी आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये, मी कुठून आले माहिती आहे ना,” असा इशारा भाजपाच्या नेत्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महा विकास आघाडी सरकारला दिला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, पीडित तरुणी आमच्याकडे येऊन बोलत नाही किंवा आमच्याशी संपर्क करत नाही, असं अनेक वेळा महाविकास आघाडी मधील नेत्याकडून बोलले जात आहे. पण ती तरुणी आमच्याकडे येऊन व्यक्त झाली आहे. आमच्यात विश्वासार्हता असल्याने ती आमच्याजवळ आली आहे. त्यामुळे आम्ही पीडित तरुणीला निश्चित न्याय मिळून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“नार्को टेस्ट करायला कोर्टाची ऑर्डर लागते असे कोणीही मागणी करून नार्को टेस्ट होत नाही. कोणीही ऐरे गैरे यांनी मागणी करून नार्को टेस्ट होत नाही,” अशा शब्दांत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला.