देशी बनावटीची पिस्तुले, काडतुसे जप्त

पुणे : मुंबईतील छोटा राजन टोळीतील गुंडाला तसेच कोथरूड भागातील गज्या मारणे टोळीतील गुंडाला गुन्हे शाखेने पौड रस्त्यावर जेरबंद केले. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले तसेच तीन काडतुसे जप्त करण्यात आली.

जमीर मोइद्दीन शेख (वय २६,रा. भूगाव, ता. मुळशी) आणि अजय सुभाष चक्रनारायण (वय २३,रा. लक्ष्मीनारायण मंदिराजवळ, पाषाण) अशी जेरबंद केलेल्यांची नावे आहेत. पौड रस्त्यावर गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी या परिसरातील एका हॉटेलमध्ये छोटा राजन टोळीतील गुंड येणार असून त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस हवालदार प्रशांत पवार आणि पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा लावून शेख आणि चक्रनारायण यांना ताब्यात घेतले. दोघांची झडती घेण्यात आली. त्यांच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुले आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली. दोघांना न्यायालयाने १६ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, संजय गायकवाड, किरण अडागळे, मच्छिंद्र वाळके, गजानन गाणबोटे, दीपक मते, विल्सन डिसोझा आदींनी ही कारवाई केली. आरोपी चक्रनारायण एका माथाडी संघटनेचा सदस्य आहे. शेख गज्या मारणे टोळीतील सराईत आहे. चक्रनारायण आणि शेख यांच्या विरोधात यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.