पुणे विद्यापीठाच्या नावाचा विस्तार करून ते ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिसभेत संमत झाला. या नामविस्तारासाठी गेली काही वर्षे विविध पातळ्यांवर आंदोलने करण्यात आली होती. परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी विविध प्रकारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.
विद्यापीठाच्या आज झालेल्या अधिसभेत सदस्य शशिकांत तिकोटे यांनी या नामविस्ताराचा प्रस्ताव मांडला, त्याला सुधाकर जाधवराव यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावामागील पाश्र्वभूमी व आजवर झालेल्या विविध प्रकारच्या चर्चा याबाबत सदस्य दत्ता बाळसराफ यांनी अधिसभेत माहिती दिली. या वेळी बोलताना अधिसभा सदस्य प्रा. शिरीष एकबोटे यांनी नामविस्तार करताना ‘पुणे विद्यापीठ’ हे शब्द नामविस्तारात असावेत, अशी सूचना केली, ती मान्य करण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाच्या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन पुणे विद्यापीठाचे नाव बदलण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. विशेषत: मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार आणि त्यासाठी केलेले कष्ट लक्षात घेता, त्यांचे नाव विद्यापीठाला देणे उचित होईल, असे मत अनेकदा व्यक्त करण्यात आले होते.
विद्यापीठाच्या नावातील पुणे विद्यापीठ हे नाव तसेच ठेवून नामविस्तार करण्याच्या या प्रस्तावाला उपस्थित सदस्यांनी एकमताने पाठिंबा दिला. राज्य शासनाने नामविस्ताराबाबत अनेकदा भूमिका स्पष्ट करताना विद्यापीठाने असा प्रस्ताव पारित करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्या पाश्र्वभूमीवर आज संमत झालेला प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे अधिसभेच्या आजच्या बैठकीत सांगण्यात आले.
परिवर्तनवादी चळवळीतील अनेक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा