पुणे : शहरातील एका सराफी पेढीच्या मालकाकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर ससून रूग्णालयातील प्रसाधन गृहाच्या खिडकीतून पसार होण्याच्या प्रयत्नात मृत्युमुखी पडलेल्या दीप्ती काळेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सुरू केली आहे.

सीआयडीच्या पथकाने ससून रूग्णालयात जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. व काळे नेमकी कशी पडली, याची माहिती घेतली. पोलीस कोठडीत असलेल्या एखाद्या आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे सोपविण्यात येते. त्यानुसार सीआयडीकडून दीप्ती काळे मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

शहरातील एका सराफी पेढीच्या मालकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी दीप्ती सरोज काळे (रा. न्याती इक्वोटिरियम, बावधन) आणि निलेश उमेश शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. काळे विरोधात खंडणीचा गुन्हा यापूर्वी दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी काळेसह शेलार यांच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करून काळेला अटक केली होती. पोलीस कोठडीत असताना ती आजारी पडल्याने तिला ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ससून रूग्णालयाच्या नवीन इमारतीत आठव्या मजल्यावरील कक्षात तिच्यावर उपचार सुरू होते. प्रसाधनगृहात जाण्याच्या बहाण्याने तिने खिडकीच्या काचा सरकवल्या. पाईप पकडून ती खाली उतरत असताना तोल जाऊन पडली. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी २७ एप्रिल रोजी ही घटना घडली होती.

Story img Loader