पुणे : सध्या अवघ्या देशभर आयपीएलचा फीवर आहे. गल्लोगल्ली, मैदानांवर क्रिकेट खेळण्यात तरुण मग्न आहेत. दुसरीकडे आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन सट्टा जोरात सुरू आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनने अशाच ऑनलाइन सट्ट्याचे बुकिंग घेणाऱ्या पाचजणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल संघाच्या सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्या पाचजणांना अटक केली आहे. अटक केलेल्या बुकींच्या मोबाईलमध्ये ‘ताज ७७७’ नावाचे अॅप आढळले आहे. टीव्हीवरील प्रक्षेपणापूर्वी क्रिकेट सामन्याच्या एक चेंडू अगोदर ताज या अॅपवर प्रक्षेपण व्हायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा – पिंपरी: शालेय जीवनातच शहरातील विद्यार्थ्यांना गंभीर आजारांचा विळखा
याचा फायदा घेऊन बुकी लाखो रुपयांची उलाढाल करत असल्याचे उजेडात आले आहे. आरोपींकडून १४ मोबाईल, एक लॅपटॉप, दोन वायफाय आणि जुगार खेळण्यास लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. गोविंद प्रभूदास लालवानी, कन्हैयालाल हरजानी, देवानंद दरयानी, रमेश मिराणी, हरेश थटाई या पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल संघाच्या क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा घेतला जात असून चिंचवडच्या लिंकरोडवरील मेट्रोपोलिटीन या उच्चभ्रू सोसायटीत बंद फ्लॅटमध्ये पाचजण सट्टा खेळत आहेत, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा घातला. पाचही बुकी पूर्ण सेटप लावून बसलेले आढळले.
हेही वाचा – पुणे जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याचे पोलीस भरतीचे स्वप्न साकार!
बुकींच्या मोबाईलमध्ये ‘ताज ७७७’ नावाचे अॅप आढळले असून, त्यावर टीव्ही प्रेक्षपणाच्या एक चेंडू अगोदर (काही सेकंद अगोदर) प्रक्षेपण व्हायचे, असे तपासात उजेडात आले आहे. याचा फायदा घेऊन बुकी ऑनलाइन सट्टा घ्यायचे. ते लाखोंची उलाढाल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, जयंत राऊत, प्रमोद वेताळ, देवा राऊत, सागर अवसरे यांनी ही कारवाई केली आहे.