पुणे : राज्य मंडळ, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्यानंतर आता कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सने (सीआयएससीई) दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीच्या परीक्षा १८ फेब्रुवारीपासून, तर बारावीच्या परीक्षा १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

सीआयएससीईने परीक्षांच्या वेळापत्रकाबाबतची माहिती दिली. दहावीची परीक्षा १८ फेब्रुवारी ते २७ मार्च, तर बारावीची परीक्षा १३ फेब्रुवारी ते ५ एप्रिल या कालावधीत घेतली जाणार आहे. दहावीची परीक्षा इंग्रजी भाषा विषयाने सुरू, तर पर्यावरणशास्त्र विषयाने संपणार आहे. तर पर्यावरणशास्त्र विषयाने बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकासह काही महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रश्नपत्रिकेत दिलेल्या वेळेव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी अतिरिक्त १५ मिनिटे मिळतील. तसेच परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>अकरापैकी एकाच नगरसेवकाला आमदारपद, उर्वरित १० जणांचे स्वप्न निवडणूक हरल्यामुळे भंगले

दहावीच्या परीक्षेसाठी १ हजार ४६१ शाळांतील १ लाख ६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात ५२ हजार ६९२ मुले, ४७ हजार ३७५ मुली आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी २ हजार ८०३ शाळांतील २ लाख ५३ हजार ३८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यात १ लाख २५ हजार २६८ मुले, १ लाख १८ हजार ११६ मुली आहेत.  देशभरातील आणि परदेशातील केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. https://cisce.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.