लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : विमानतळावर महिला प्रवाशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) जवान महिलेला धक्काबुक्की करून हाताचा चावा घेतल्याची घटना घडली. पुणे-दिल्ली विमानप्रवास आसनावरून दोन प्रवाशांत वाद झाला. त्यावेळी समजूत घालणाऱ्या महिलेला धक्काबुक्की करून तिच्या हाताचा चावा घेणाऱ्या प्रवासी महिलेविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सुरेखा सिंग (वय ४४, रा. कुमार पिकाडेली सोसायटी, वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या महिला प्रवाशाचे नाव आहे. याबाबत सीआयएसएफमधील जवान प्रियंका रेड्डी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे-दिल्ली विमानातून सुरेखा सिंग शनिवारी सकाळी दिल्लीला निघाल्या होत्या. त्यावेळी विमानातील आसन क्रमांकावरून त्यांचा अवंतिका बोरसे, आदित्य बोरसे यांच्याशी वाद झाला. वादातून सिंग यांनी बोरसे दाम्पत्याला धक्काबुक्की केली.

आणखी वाचा-अभियांत्रिकी प्रवेशात विद्यार्थ्यांची कोणत्या अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती?

या घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील औद्योगिक सुरक्षा दलातील जवान प्रियंका रेड्डी आणि त्यांच्या सहकारी सोनिका पाल तेथे गेल्या. विमानात सुरू असलेल्या वादात मध्यस्थी केली. त्यानंतर सिंग यांनी रेड्डी आणि पाल यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सिंग यांनी रेड्डी यांच्या हाताचा चावा घेतला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५ (०५) अन्वये सिंग यांना नोटीस बजावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक होळकर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cisf jawan bitten on hand by female passenger at airport pune print news rbk 25 mrj