पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) क्षेत्र मोठे आहे. या क्षेत्रात मोठय़ा संख्येने असलेली गावे स्वयंपूर्ण व्हावीत, यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन पालकमंत्री व पीएमआरडीएचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी आकुर्डीत केले. कामाचे नियोजन आणि नियोजनाप्रमाणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत पुणे व परिसराच्या सर्वागीण विकासासाठी शासनाकडून भरघोस निधी प्राप्त करू, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘पीएमआरडीए’च्या आकुर्डी येथील मुख्यालयाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, बाळा भेगडे, जगदीश मुळुक, पुण्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे, पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे, सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त एस. चोक्किलगम, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर नांगनुरे, जिल्हधिकारी सौरभ राव, पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, पिंपरीचे आयुक्त राजीव जाधव, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश जाधव आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, ‘पीएमआरडीए’च्या कार्यक्षेत्रात ४०० हून अधिक गावे आहेत. त्या गावांच्या संस्कृतीला धक्का पोहोचणार नाही. मात्र, आधुनिक दृष्टिकोन ठेवून नियोजन केले जाईल. गावे स्वयंपूर्ण व्हावीत, जेणेकरून लहान-सहान गोष्टींसाठी शहरात येण्याची गरज उरणार नाही. ‘पीएमआरडीए’च्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊ. सर्वाच्या सोबतीने विकासाची कास धरू. आपण १८ वर्षे मागे पडलो आहोत. तो अनुशेष भरून काढण्यासाठी पाच वर्षांचे नियोजन हवे. त्यासाठी सर्वाची सकारात्मक मानसिकता हवी. नांगनुरे यांनी प्रास्ताविक केले. अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले.