लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्व उपनगरांमध्ये चौकाचौकांत उभारलेल्या दहीहंड्यांनी आवाजी उच्छाद घातला. वाहतूककोंडी, डोळ्यांना त्रास देणाऱ्या लेजर दिव्यांसह धडकी भरवणाऱ्या ध्वनिवर्धक आणि ‘पारंपरिक’ ढोल-ताशांच्या दणदणाटाने पुणेकरांना अक्षरश: हैराण केले.

गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाप्रमाणेच दहीहंडीचा उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. त्यानुसार शहराच्या मध्यवर्ती भागासह सिंहगड रस्ता परिसर, धायरी, कोथरूड, वारजे, शिवाजीनगर, सहकारनगर, औंध, बाणेर, लष्कर, कात्रज, कोंढवा अशा सर्वच भागांतील चौकाचौकांमध्ये दहीहंड्या उभारल्या जातात. यंदा बऱ्याच ठिकाणी बुधवार सायंकाळपासूनच मंडळांकडून दहीदंही उभारण्याचे काम सुरू झाले. दहीहंडीसह रस्त्यावरच व्यासपीठही उभारण्यात आले होते. काही ठिकाणी चौकांच्या परिसरात परस्पर नो पार्किंगचे फलक लावण्यात आले. दहीहंडी गुरुवारी असताना बुधवारी मध्यरात्रीच दचकवणाऱ्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

आणखी वाचा-रेल्वेची अशीही हुशारी! विजबिलात करणार लाखोंची बचत

शहरात सर्वत्र गुरुवारी सायंकाळपासून दहीहंड्या फोडण्यास सुरुवात झाली. त्याला ‘आवाजी’ ध्वनिवर्धक आणि ‘पारंपरिक’ ढोल-ताशांची जोड देण्यात आली होती. काही ठिकाणी तर ध्वनिवर्धक आणि ढोल-ताशा असा दुहेरी दणदणाट सुरू होता. ध्वनिवर्धक आणि ढोल-ताशांच्या आवाजामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले. काहींनी समाजमाध्यमांतून या दणदणाटाविरोधात संताप व्यक्त केला, तर सायंकाळनंतर डोळे दिपवणाऱ्या लेजर दिव्यांची रोषणाईही सुरू झाली. त्याचा वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.

शहर, उपनगरांतील दहीहड्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ

गेल्या वर्षी शहराच्या मध्यवर्ती भागात सुमारे १२५ दहीहंड्यांना पोलिसांकडून परवानगी देण्यात आली होती. तर यंदा दहीहंड्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले. शहराच्या उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात दहीहंड्या उभारण्यात आल्या. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी नागरिकांना वाहतूककोंडी, दणदणाटी आवाज सहन करावा लागला.

आणखी वाचा-पीएमपी बसवर झाड कोसळले

मंडळे, स्थानिक राजकीय नेत्यांकडून रस्त्यांचा ताबा

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहतुकीमध्ये बदलही करण्यात आला होता. मात्र मंडळे आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी बुधवार सायंकाळपासूनच रस्त्यांचा ताबा घेतला. त्यामुळे वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens are annoyed by the sound of loudspeakers and drums in dahi handi pune print news ccp 14 mrj
Show comments