ऐन थंडीत पडलेला पाऊस आणि हवेतील उकाडा वाढवणारे पावसाळी वातावरण पुण्यातील डेंग्यूच्या फैलावास पोषकच ठरले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण नोव्हेंबरमध्ये आढळले असून डिसेंबरमध्येही ही संख्या दर दिवशी सरासरी ४ ते ५ अशी वाढतेच आहे. विशेष म्हणजे डासांची पैदास शोधून डासअळीनाशक औषधांची फवारणी करण्यास गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांकडूनच विरोध होत असल्याचे दिसून येत आहे.
  नोव्हेंबरच्या मध्यानंतर आंध्र प्रदेशच्या किनापट्टीवर ‘हेलन’ आणि ‘लेहर’ ही दोन वादळे एकामागोमाग एक धडकली. या वादळांचा परिणाम म्हणून ऐन थंडीच्या दिवसांत पडलेला पाऊस पुण्यानेही अनुभवला. कडाक्याच्या थंडीत डासांची पैदास कमी होत असली तरी चुकीच्या वेळी पडलेल्या पावसामुळे पुण्यात थंडीचा अपेक्षित परिणाम दिसू शकला नाही. परिणामी थंडी असूनही डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत घट तर दिसली नाहीच, उलट नोव्हेंबरमध्ये शहरात २०८ जणांना डेंग्यू झाल्याचे आढळले आहे. तर डिसेंबरमध्ये आतापर्यंत २३ जणांना डेंग्यू झाला आहे.जानेवारीपासून आतापर्यंत शहरात एकूण डेंग्यूचे एकूण ६६८ संशयित रुग्ण सापडले आहेत.
डेंग्यूबाबत नागरिकांची उदासीनता कायम आहे. डासअळीनाशक औषधांची फवारणी करण्यास जाणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना नागरिकांकडून विरोध होत असल्याचे पालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. श्याम सातपुते यांनी सांगितले. डॉ. सातपुते म्हणाले, ‘‘डेंग्यूचा रुग्ण सापडलेल्या भागातील आसपासच्या शंभर घरांचे सर्वेक्षण पालिका कर्मचारी करतात. या घरांत तापाचे रुग्ण आढळतात का ते पाहणे, डासांची पैदास शोधणे हे या सर्वेक्षणाचे उद्दिष्टय़ असते. एसी, रेफ्रिजरेटर, घरातील व परिसरात पडलेली फुटकी डबडी अशा ठिकाणी हमखास पाणी साठून डासांची पैदास होते. परंतु या कामासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना नागरिक घरातही शिरू देत नसल्याचे अनेकदा दिसते. घरात औषध फवारणी करून घेण्यासही नागरिक विरोध करतात.’’
डेंग्यूचा आलेख-
महिना डेंग्यूचे रुग्ण
ऑगस्ट  १०४
सप्टेंबर  १५७
ऑक्टोबर  १२२
नोव्हेंबर २०८
डिसेंबर(आतापर्यंत) २३
डेंग्यू चाचणीच्या किट्सचा अजूनही
एनआयव्ही आणि ससूनमध्ये तुटवडा
गेल्या दोन महिन्यांपासून नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि ससून सवरेपचार रुग्णालय या दोन्ही ठिकाणी डेंग्यू चाचणीसाठीच्या किट्सचा तुटवडा असून एनआयव्हीकडे पालिकेतर्फे डेंग्यूच्या चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी केवळ ५ टक्केच नमुन्यांच्या चाचण्या होऊ शकत असल्याचे महापालिकेतील सूत्रांकडून समजते. राज्याचे आरोग्य सहसंचालक डॉ. व्ही. डी. खानंदे म्हणाले, ‘‘एनआयव्ही किंवा ससूनकडून डेंग्यू किट्सची मागणी राज्याकडे केली गेल्यास ती केंद्र सरकारकडे पाठवून किट्स उपलब्ध करून देण्यात येतील. परंतु पालिकेनेही अडचणीच्या वेळी डेंग्यू किट्स उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. तापाच्या प्रत्येक रुग्णाची डेंग्यूसाठी चाचणी करणे शक्य नसून ज्या रुग्णाची लक्षणे डेंग्यूसदृश दिसतात त्याचीच डेंग्यूसाठी चाचणी केली जाते. डेंग्यूची लक्षणे ओळखून रुग्णावर लवकरात लवकर उपचार सुरू करणे अपेक्षित आहे.’’ 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा