लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना महापालिकेच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसांपासून मिळकतकर भरण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. अडचण दूर करण्याचे काम सुरू असल्याचे मिळकतकर विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
महापालिकेचा महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत म्हणून मिळकतकर विभागाकडे पाहिले जाते. मागील आर्थिक वर्षात (२०२४-२५) या विभागाला सर्वसाधारण २७०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट अंदाजपत्रकात देण्यात आले होते. त्यांपैकी आतापर्यंत २१०० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामुळे उर्वरित ६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान मिळकतकर विभागापुढे आहे. मार्च महिना संपण्यासाठी केवळ २० दिवस बाकी आहेत. त्यामुळे मिळकतकर विभागाकडून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या चार दिवसांपासून मिळकतकर विभागाचा सर्व्हर तांत्रिक बिघाडामुळे बंद पडत आहे. त्यामुळे मिळकतकर भरण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. मिळकतकरभरणा केंद्राच्या बाहेर अनेक ठिकाणी सर्व्हर बंद असल्याचे फलक लावला आहे. यामुळे मिळकतकराच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंदाजपत्रकात दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांचा फायदा मिळकतकरवसुलीसाठी होणार होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने या गावातून मिळकतकर वसूल करण्यास स्थगिती दिली आहे. तसेच या गावांतील थकबाकीदारांवर कारवाई न करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची अडचण झाली आहे. त्यातच गेल्या चार दिवसापांसून मिळकतकर विभागाचे सर्व्हर बंद पडत असल्याने कर भरण्याचे काम थांबले आहे. वारंवार सर्व्हर डाऊन होत असल्याने कर्मचारी व नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी त्याला दुजोरा दिला. ते म्हणाले, ‘मिळकतकर भरण्यासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर जुने आहे. त्यामुळे त्यामध्ये बिघाड होतो. वारंवार असा प्रकार घडत असल्याने तांत्रिक अडचणी येत असून, नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या तांत्रिक अडचणी सोडविण्याचे काम काम सुरू आहे. सोमवारपर्यंत कामकाज पूर्ववत होईल.