पुणे: वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) आणि वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र (आरसी) नागरिकांना घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. नागरिकांना यासाठी टपाल विभागात आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. अखेर दोन्हीकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने त्यांना आरटीओतील एजंटाना पैसे देऊन हे काम करून घ्यावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहन चालविण्याचा परवाना आणि वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र आरटीओकडून संबंधित व्यक्तीच्या घरी त्याच्या पत्त्यावर पाठविले जाते. ते मिळाले नाही म्हणून दररोज अनेक नागरिक आरटीओमध्ये चौकशीसाठी येतात. तिथे त्यांना टपाल विभागाकडे असल्याचे सांगितले जाते. नागरिक टपाल विभागातही चौकशीसाठी जातात त्यावेळी आरटीओकडे पाठविल्याचे सांगितले जाते. या सर्व गोंधळात नागरिकांना तब्बल वर्षभरानंतरही परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा… राज्यातील दीड कोटी निरक्षर शोधण्याचे लक्ष्य; केंद्र सरकारचे नवभारत साक्षरता अभियान, शिक्षकांवर नवा ताण

अखेर नागरिक आरटीओ एजंटाकडे याबाबत विचारणा करीत आहेत. यानंतर एजंट दोन ते अडीच हजार रुपये घेत आहेत. त्यानंतर नागरिकांना त्यांचा परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र मिळत आहे. परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरपोच न मिळण्यात चुकीचा पत्ता कारणीभूत असल्याचा दावा आरटीओ आणि टपाल विभागाकडून केला जात आहे. मात्र, मोबाईल क्रमांक त्यावर असताना संबंधित नागरिकाशी संपर्क करून ही कागदपत्रे त्याच्या हवाली का केली जात नाहीत, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

परिवहन आयुक्तांकडे मागणी

परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र छपाई केंद्राच्या बदललेल्या धोरणाचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. राज्यभरात लाखो परवाने व वाहन नोंदणी प्रमाणपत्रे नागरिकांना अद्याप मिळालेली नाहीत. संपूर्ण राज्यात ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे केली आहे.

संबंधित व्यक्तीचा पत्ता सापडला नाही तर असे परवाने आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रे परत आरटीओमध्ये येतात. पत्ता न सापडल्याने ती परत येण्याचे प्रमाण केवळ अर्धा टक्का आहे. लवकरात लवकर नागरिकांपर्यंत ही कागदपत्रे घरपोच पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

पत्ता न सापडल्याने वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र परत येण्याचे प्रमाण २ ते ३ टक्के आहे. परत आलेली ही कागदपत्रे नागरिकांना देण्यासाठी पुण्यातील मुख्य टपाल कार्यालयात केंद्र सुरू केलेले आहे. तिथून नागरिक त्यांची ही कागदपत्रे घेऊन जाऊ शकतात. आम्ही ही कागदपत्रे पोहोचविण्याला नेहमीच प्राधान्य देतो. – एस.पी. दळवी, व्यवस्थापक, टपाल व्यवसाय विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens have to pay money to the rto agents due to not getting driving license and rc at home pune print news stj 05 dvr
Show comments