पुण्यात बारा सभांच्या आयोजनातून उपक्रमास सुरुवात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धकाधकीच्या दैनंदिन जीवनात नागरिकांना अनेक प्रश्न भेडसावतात. या प्रश्नांची उकल राजकारणी लोकांकडून होत नाही. त्यामुळे हे प्रश्न नागरिकांच्यासमोर मांडून संघटितपणे आवाज उठविण्याचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र नागरिक सभा ही अराजकीय संघटना कार्यरत राहणार आहे.  त्याचाच एक भाग म्हणून विविध बारा प्रश्नांचा वेध घेण्याच्या उद्देशातून रविवारी (११ नोव्हेंबर) बारा सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू होत असलेल्या उपक्रमाचा लवकरच राज्यभरात विस्तार करण्यात येणार आहे.

जागरूक नागरिकांनी एकत्र येत आपल्या प्रश्नांना वाचा फोडावी, या विचारातून रविवारी पुण्यातील वेगवेगळ्या बारा ठिकाणी जमून विविध प्रश्नांवर व्यक्त व्हावे आणि त्याची जाहीर वाच्यता करावी हाच त्यामागचा विचार आहे.

सध्याच्या राजकीय आणि सामाजिक चर्चा विश्वातून जनतेच्या दररोजच्या प्रश्नांना बगल दिली जात आहे, असे ज्यांना जाणवते अशा नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे आणि विविध विषयांमध्ये भेडसावणाऱ्या प्रश्नांवर सामान्य नागरिक म्हणून व्यक्त व्हावे, असे महाराष्ट्र नागरिक सभेचे समन्वयक संदेश भंडारे यांनी सांगितले.

लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप या आभासी माध्यमांचा वापर करण्यात येणार असला तरी यामध्ये नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग अपेक्षित आहे. लेखक, कलाकार हेदेखील सामान्य नागरिक असतात. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांवर त्यांनी बोलले पाहिजे हीच त्यामागची धारणा आहे.

राजकीय पक्ष वाईट आहेत, अशी भूमिका नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संघटना स्वागतच करेल. पक्षीय राजकारणापलीकडचे व्यासपीठ म्हणून हा प्रयोग रविवारी पुण्यात राबविण्यात येत आहे. त्याची व्याप्ती राज्यभरात होत असून २८ जिल्ह्य़ांमध्ये संघटनेचे साडेचारशेहून अधिक कार्यकर्ते आहेत, असेही भंडारे यांनी सांगितले.

रविवारच्या सभांचे नियोजन (विषय, संवादक, प्रमुख उपस्थिती आणि स्थळ याप्रमाणे)

* शिक्षण, लोकेश लाठे, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, स. प. महाविद्यालयासमोर, टिळक रस्ता

* आरोग्य, सुजित केंगार, डॉ. मोहन देस, ससून रुग्णालयासमोर, पुणे स्टेशन परिसर

* रोजगार, अनुप देशमुख, माधव पळशीकर, अहिल्या अभ्यासिकेसमोर, शास्त्री रस्ता

* स्त्री अधिकार, कल्याणी माणगावे, गीताली वि. म., सावित्रीबाई फुले स्मारक, सारसबागेसमोर

* शेती-पाणी,  सुनील अभंग, मुकुंद किर्दत, गोखले इन्स्टिटय़ूटसमोर, डेक्कन

* पर्यावरण, शताक्षी गावडे,  प्रशांत कोठाडिया, सिमला ऑफिससमोर, शिवाजीनगर

* कला-साहित्य-संस्कृती,  सुशीलकुमार शिंदे, धनाजी गुरव, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, जंगली महाराज रस्ता

* सामाजिक न्याय, संदीप बर्वे, नितीन पवार, दांडेकर चौक, सिंहगड रस्ता

* सार्वजनिक वाहतूक, अभिजित मंगल, विवेक वेलणकर, केशवराव जेधे पुतळा, स्वारगेट

* सार्वजनिक स्वच्छता-पाणीपुरवठा, विवेक भरगुडे, किरण मोघे, पुणे महानगरपालिकेसमोर

* कायदा-सुव्यवस्था, कुणाल शिरसाठे, अन्वर राजन, पोलीस आयुक्तालयासमोर

* पेट्रोल, डिझेल- गॅस दरवाढ, हनुमंत पवार, अजित अभ्यंकर, टिळक चौक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens meeting to raise voice on citizens issues
Show comments