पिंपरी : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने नवीन वर्षानिमित्त शहरवासीयांना मालमत्तेची ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आजपासून होणाऱ्या सर्व नोंदी फक्त ऑनलाइन होणार आहेत. मालमत्ता कर उताराही ऑनलाइन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे मालमत्ता नोंदणीसाठी महापालिकेत हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सध्या सहा लाख १५ हजार विविध मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांना कराची आकारणी व वसुलीची कार्यवाही करण्यात येते. यासाठी १७ विभागीय करसंकलन कार्यालये कार्यरत आहेत. मालमत्ता धारकांना विविध शासकीय कामांसाठी मालमत्ता कर उतारा लागतो. हा उतारा काढण्यासाठी यापूर्वी नागरिकांना प्रत्यक्ष कर संकलन कार्यालयात जावे लागायचे. त्यानंतर मालमत्ता आकारणी पुस्तकात उतारे शोधावे लागत होते. त्यानंतर हा उतारा हस्तलिखित स्वरुपात दिला जात होता. यासाठी विलंब लागत होता. आजपासून सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. एक जानेवारीनंतर ज्यांची ऑनलाईन नोंदणी होणार आहे, त्यांना उतारा तत्काळ मिळेल. यासाठी नाममात्र असे २० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन कर आकारणी व कर संकलन विभागाचा पर्याय निवडावा लागेल. मोबाईल क्रमांक किंवा मालमत्ता क्रमांक टाकला की त्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिसतील. मालमत्ता कर उतारा हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर ‘क्लिक’ करून मालमत्ता कर उतारा मिळवता येणार आहे. ही प्रक्रिया ओटीपी आधारित असल्याने नागरिकांना त्यांच्या मालमत्तेला आपला मोबाईल क्रमांक लिंक करावा लागणार आहे. आतापर्यंत जवळपास साडेचार लाख मालमत्तांना मोबाईल नंबर जोडले (लिंक) केलेले आहेत. उर्वरित मालमत्ताधारकांनीही मोबाईल नंबर आपल्या मालमत्तेला जोडण्याचे आवाहन केले आहे.
कर संकलन विभागाच्या विविध सुविधा ऑनलाइन
ना हरकत दाखला, मालमत्ता हस्तांतरण, विविध कर सवलत योजना प्रक्रिया ऑनलाइन सुविधा, कर संवाद, तू करदाता तू करविता यातून प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा नागरिकांना मोठा फायदा होत आहे.
हेही वाचा – वंचितला इंडिया आघाडीत प्रवेश मिळणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आत्ता तरी आमच्यासाठी..”
कर संकलन विभाग आणि दुय्यम निबंधक कार्यालये यांच्या ‘डेटाबेसचे इंटेग्रेशन’ करणार आहोत. त्यामुळे खरेदी खत, बक्षिसपत्र, इच्छापत्र याद्वारे मालमत्तांचे होणारे हस्तांतरण करण्यासाठी मालमत्ता धारकांना आता अर्ज करण्याची गरज राहणार नाही. मालमत्तेच्या नावात तत्काळ बदल होणार आहे. – नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका