पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत ढोलताशा, ध्वनिवर्धकांनी केलेल्या दणदणाटामुळे ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. या निमित्ताने सणासुदीच्या काळातील ध्वनिप्रदूषणाविरोधात ऑनलाइन याचिकेची मोहीम सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत पाच हजारांहून अधिक पुणेकरांनी या याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे.

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांत अनियंत्रित ध्वनिप्रदूषण वाढले आहे. ध्वनिपातळीतील ही वाढ पुणेकरांच्या आरोग्यासह पर्यावरणासाठी धोकादायक आहे. कायद्यानुसार दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल ध्वनिपातळीला परवानगी आहे. मात्र उत्सवाच्या काळात सरासरी ध्वनिपातळीने ही मर्यादा ओलांडली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सरासरी ध्वनिपातळी १०५ डेसिबलपर्यंत वाढली. त्यामुळे नागरिकांना तणाव, श्रवणदोष, झोपेचा त्रास अशा गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत.

हेही वाचा – राजकीय पक्षांचाही दणदणाटाविरोधात ‘आवाज’

हेही वाचा – पोलिसांचे ‘कानावर हात’

ध्वनिप्रदूषणाच्या या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलणे अत्यावश्यक आहे. सण हे सांस्कृतिक ओळखीचा एक आवश्यक भाग आहेत, सणांमुळे लोक एकत्र येत असले, तरी उत्सवामुळे आरोग्य आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ध्वनिप्रदूषणाचे कठोर नियम लागू करावेत, उल्लंघन करणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी, पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे आणि त्यासाठी जनजागृती करणे, ध्वनी प्रदूषणाचे हानिकारक परिणाम आणि जबाबदार उत्सवाचे महत्त्व या बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवणे, सणासुदीच्या काळात ध्वनिपातळीचे निरीक्षण करण्यासाठी आणि तक्रारी त्वरित सोडवण्यासाठी सक्षम प्रणाली निर्माण करण्याची मागणी महापालिकेकडे याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Story img Loader