पिंपरी : वाढत्या हवा प्रदूषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाकड, ताथवडे आणि मारुंजी परिसरातील नागरिकांनी शनिवारी मूकमोर्चा काढला. तेवीसहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांतील पाचशेहून अधिक रहिवासी हवा प्रदूषण विरोधी मुकमोर्चात प्रशासनाचा निषेधार्थ तोंडाला काळे मास्क व हाताला लाल रिबन बांधून सहभागी झाले होते.

वाकड-ताथवडे हौसिंग सोसायटीज फोरम यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा कोहिनूर कोर्टयार्ड वन सोसायटी पासून इंदिरा स्कूल मार्गे वाकडकर चौकापर्यंत नेण्यात आला. या मोर्चात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी मूक मोर्चाद्वारे पर्यावरण, प्रदूषण, नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले. सिमेंट मिक्स धूळ आणि रस्त्यावरील अवजड वाहनांमुळे होणारे प्रदूषण यामुळे परिसरातील हवेची गुणवत्ता अत्यंत खालावली असून श्वसनाचे आजार वाढत असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. ‘धुळीने भरली आमची छाती’, ‘पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पीएमआरडीए हवेतील प्रदूषण कमी करा’, ‘प्रशासन झोपले आहे, नागरिक त्रासले आहेत’, ‘नको धूळ, शुद्ध हवा आमचा अधिकार’, ‘दुर्लक्ष करी सरकारी खाती, धुळीने भरली आमची छाती’, ‘आमच्या जीवाशी खेळू नका, आम्ही कर भरतो, धूळ खाण्यासाठी नाही’, अशा आशयाचे विविध फलक हातात धरून रहिवाशी मोर्चात सहभागी झाले होते. शांततेत निघालेल्या या मुकमोर्चात वाहतुकीला आणि विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून स्वयंसेवकांनी काळजी घेतली होती. अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिसांचाही बंदोबस्त तैनात होता.

नागरिकांच्या मागण्या

सिमेंट मिक्स धूळ त्वरित बंद व्हावी.

वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक नियम आणि उपाययोजना लागू कराव्यात.

वायू प्रदूषण पातळीची नियमित तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा.

रस्त्यांची नियमित दोन वेळा साफसफाई करून धुळीचे प्रमाण कमी करावे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कठोर कारवाई केली जावी.

स्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी टँकरद्वारे नियमितपणे पाण्याचा फवारा मारला जावा.

प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून आवश्यक ती आरोग्यसेवा पुरवावी.

रस्त्यांवरील झाडांची देखभाल आणि पाणी नियमित करावे.

नागरिकांना स्वच्छ हवा मिळाली पाहिजे. वाढत्या हवा प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. स्वच्छ हवा मिळेपर्यंत आम्ही लढत राहू, रहिवासी अशोक साळुंखे यांनी सांगितले.