पिंपरी : वाढत्या इलेक्ट्रिक कचऱ्याची (ई-वेस्ट) विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका, ग्रीन स्केप आणि ईसीए यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरीत ई-वेस्ट रिसायकलिंग, प्लॅस्टिक रिसायकलिंग सेंटर उभारण्यात आले आहे. या दोन्ही संस्था शहरातील विविध भागात जाऊन ई-वेस्ट संकलित करत असून, नागरिकांना ई-वेस्टसाठी किलोनुसार पैसे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ई-वेस्ट द्या आणि पैसे कमवा, ही संकल्पना शहरात यशस्वी होताना दिसून येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात हिंजवडी, तळवडे आयटी पार्क आहेत. नागरिकांचा दिवसेंदिवस मोबाईल फोन, लॅपटॉप आदी वस्तूंचा वापर वाढला आहे. मात्र, या वस्तू नादुरुस्त झाल्या की अनेकजण भंगारात टाकून देतात. वाढत्या लोकसंख्येनुसार ई-वेस्टही सातत्याने वाढत आहे. ई-वेस्टचा पुनर्वापर होत नसल्याने पर्यावरणाचा प्रश्नही गंभीर होत आहे. त्यामुळे महापालिका आणि शहरातील काही पर्यावरण प्रेमी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून ई-वेस्ट संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या पावणेदोन वर्षांत शहरातील विविध भागांतून तीन हजार ९६२ किलो ई-वेस्टचे संकलन करण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : प्रियकराबरोबर पळून जाताना पत्नीने घरातील दागिने, रोकड चोरली

आता ई-वेस्टसाठी नागरिकांना मोबदला देण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार लॅपटॉप, फ्रिज, टिव्ही, वातानुकूलित यंत्राना दहा रुपये किलो, तर इतर वेस्टसाठी आठ रुपये किलो दराने पैसे दिले जात आहेत. नागरिकांनी ई-वेस्ट दिले की जागेवरच पैसे दिले जातात.

ई-वेस्ट संकलनासाठी शिबीर

आयटी अभियंत्याचे वास्तव्य असलेल्या शहरातील हिंजवडी, तळवडे, वाकड, रावेत, पिंपळे-सौदागर, पिंपळेगुरव, निगडी, प्राधिकरण, संभाजीनगर, चिंचवड या भागात अभियंत्यांच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवारी आणि रविवारी ई-वेस्ट संकलनासाठी शिबीर लावण्यात येणार आहेत.

फ्रिज, वॉशिंग मशीन, फॅन, मायक्रोवेव्ह, वातानुकूलित यंत्रे, सीडी-डीव्हीडी प्लेयर, होम थिएटर्स, कॉम्प्यूटर, पेन ड्राइव्ह, हेड फोन्स, प्रिंटर्स, डिजिटल कॅमेरा, मोबाईल, चार्जर, टीव्ही, लॅपटॉप, व्हिडीओ कॅमेरा असे ई-वेस्ट स्वीकारले जाते. ट्यूबलाइट, सीएफएल बल्ब्स, काच स्वीकारल्या जात नाहीत.

शाळांमध्ये जनजागृती

ई-वेस्टबाबत शाळांमध्ये जनजागृती ई-वेस्टच्या वाढत्या समस्येबाबत तरुण पिढीमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच ई-वेस्टवर कशा पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते, याबाबतचे मार्गदर्शनपर चित्रफिती दाखविण्यात येणार आहेत.

हेही वाचा – झोपेच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर; येरवड्यात गोळ्या विकणाऱ्या एकास पकडले

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढला आहे. ई-वेस्टमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाच्या वतीने सामाजिक संस्थांच्या मदतीने संकलन मोहीम राबविण्यात येत आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे पिंपरी – चिंचवड महापालिका, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले.

जितेंद्र वाघ अतिरिक्त आयुक्त

पिंपरी-चिंचवड महापालिका

………….

शहराच्या विविध भागात दोन वाहनांच्या माध्यमातून ई-वेस्ट संकलित करण्यात येत आहे. ई-वेस्ट दिले की नागरिकांना जागेवरच पैसे देण्यात येतात. ई-वेस्टची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे, असे ग्रीन स्केप संस्थेचे रुपेश कदम म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Citizens response to pimpri chinchwad mnc e waste initiative pune print news ggy 03 ssb