पुणे : राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) नागरिकांना कामांसाठी हेलपाटे मारावे लागतात. अनेक सेवा ऑनलाइन असूनही त्यासाठी नागरिकांना चकरा माराव्या लागत असल्याचे चित्र दिसते. आता नागरिकांना या सेवा ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या मिळतील. याचबरोबर ऑनलाइन आलेल्या अर्जांचा सर्व कार्यालयांनी दोन दिवसांत निपटारा करावा, अशी तंबीही परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली आहे.
आरटीओमध्ये सध्या एकूण ८४ सेवा ऑनलाइन, तर २६ सेवा फेसलेस पद्धतीने देण्यात येत आहेत. ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची दोन दिवसांच्या आत खातरजमा करून निपटारा करणे आवश्यक आहे. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या कार्यालयांचा पुढील बैठकीमध्ये स्वतंत्रपणे आढावा घेण्यात येईल, असा आदेश परिवहन आयुक्त भिमनवर यांनी सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिला. त्यामुळे राज्यातील सर्वच आरटीओमध्ये ऑनलाइन सेवा मिळणार आहेत.
हेही वाचा – पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची काळ्या बाजारात विक्री; ११४ गॅस सिलिंडर जप्त
वितरकाकडील वाहननोंदणी, ना हरकत प्रमाणपत्रे, वाहननोंदणी प्रमाणपत्रातील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, तात्पुरती वाहननोंदणी सेवा, वाहनावरील कर्जबोजा रद्द करणे आणि वाहन मालकीचे हस्तांतरण यासह इतर सेवा ऑनलाइन पद्धतीने मिळत आहेत. याचबरोबर वाहन चालवण्याचा शिकाऊ परवाना, वाहन चालवण्याच्या परवान्याचे नूतनीकरण, वाहन चालवण्याच्या परवान्यातील पत्ताबदल आणि दुय्यम वाहनचालक परवाना यासह इतर सेवा फेसलेस पद्धतीने मिळत आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.
आरटीओतील सेवा मिळवण्यासाठी अर्जदाराकडे आधार व त्याच्याशी मोबाईल क्रमांक जोडणी असणे आवश्यक आहे. आधारशी जोडणी केलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येत असून, ओटीपीची नोंदणी परिवहन या संकेतस्थळामध्ये केल्यास अर्जदाराची माहिती व आधारवरील माहिती याची खातरजमा होते. त्यानंतर अर्जदारास पुढे अर्ज करणे शक्य होते. अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्मतारीख व मोबाइल क्रमांक याची खातरजमा झाल्यानंतर त्याला कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यक नसते. अर्जदारास नवीन वाहन चालवण्याचा परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र टपालाने पाठविण्यात येते. त्यामुळे अर्जदाराच्या वेळेची बचत होते.
आरटीओतील फेऱ्या वाचणार
राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले, तरी त्याची पुढील कार्यवाही होताना दिसून येत नव्हती. त्यामुळे नागरिकांना विनाकारण आरटीओमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या. याबाबत आम्ही अनेक दिवस परिवहन आयुक्तांकडे पाठपुरावा करीत होतो. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि आरटीओतील फेऱ्या वाचणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य वाहनचालक-मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.