भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक गुरुवारी (१३ मार्च) होत असून या बैठकीनंतर पुण्यातील उमेदवाराचे नाव घोषित होण्याची शक्यता असल्यामुळे भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचे लक्ष दिल्लीतील बैठकीकडे लागले आहे. पक्षातील संभ्रमावस्था संपणार का वाढणार हे या बैठकीनंतरच स्पष्ट होईल.
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची घोषणा करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची यापूर्वी दोनवेळा बैठक झाली होती. त्यानंतर जाहीर झालेल्या याद्यांमध्ये पुण्याच्या उमदेवाराची घोषणा न झाल्यामुळे गुरुवारी होत असलेल्या बैठकीत केंद्रीय नेते कोणाचे नाव निश्चित करतात याकडे पक्षाचे लक्ष लागले आहे. अर्थात, या बैठकीनंतर पुण्याच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईलच असेही कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पुण्यातून कोण उमेदवार असावा याबाबत गेल्या महिन्यात भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मते राज्याच्या निरीक्षकांनी नोंदवून घेतली होती. त्यावेळी अनिल शिरोळे आणि गिरीश बापट हे दोनच प्रमुख दावेदार असून त्यांच्याशिवाय कोणत्याही नावाची चर्चा झाली नाही, असे पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते.
प्रत्यक्षात निवडणुकांचे वातावरण झाल्यावर माजी खासदार प्रदीप रावत आणि पक्षाचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांचीही नावे इच्छुकांच्या यादीत आली. ही नावे आलेली असतानाच पक्षाचे नेते नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर केलेल्या चर्चेमुळे आणि पाठोपाठ मनसेने पुण्यातून दीपक पायगुडे यांची उमेदवारी घोषित केल्यामुळे भाजपमधील घोळ आणखीनच वाढला. त्यामुळे निर्माण झालेली अस्वस्थता गुरुवारी संपणार का, हाच प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे.
रुडी यांच्याकडून प्रकाश जावडेकर?
 दरम्यान, पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रुडी यांनी पुण्यासाठी जावडेकर यांच्या नावाची निश्चिती केल्याची जोरदार चर्चा बुधवारी रात्री पक्षवर्तुळात सुरू होती. राज्य निवड समितीकडून जी नावे केंद्रीय निवड समितीकडे गेली आहेत त्या तीन नावांमध्येही जावडेकर यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जावडेकरही चर्चेत आले आहेत.
काँग्रेसचा उमेदवारही जाहीर होण्याची शक्यता
पुण्यात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याबाबतही सर्व शक्यता व्यक्त होत असून पक्षश्रेष्ठींकडून गुरुवारी पुण्याचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. त्याबरोबरच नावाची घोषणा लांबणीर पडू शकते, अशीही चर्चा आहे. आमदार विनायक निम्हण, युवक काँग्रसचे अध्यक्ष विश्वजित कदम, आमदार मोहन जोशी आणि शहराध्यक्ष अभय छाजेड यांच्यात चुरस असून यापैकी कोणाचेही नाव जाहीर होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. प्रदेश समितीकडून कोणती नावे केंद्रीय समितीकडे गेली आहेत याबाबतही नेमकी माहिती अद्याप बाहेर आलेली नाही. त्यामुळे कोणाची उमेदवारी जाहीर होईल याबाबत सध्या फक्त तर्कवितर्कच सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा