शहरातील स्थलदर्शक आणि दिशादर्शक फलक शहराची ओळखच. पुण्यात मात्र ही ओळख धुळीने बरबटलेली, पुसलेली आणि तुटलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या फलकांची जबाबदारी असलेल्या महापालिकेचे या फलकांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.
विविध चौक, रस्ते, ठिकाणांवर महानगरपालिकेतर्फे माहिती देणारे फलक बसवले आहेत. या फलकांच्या मदतीने ठिकाणांची माहिती मिळते. परगावचे वाहनचालक, पायी जाणारे नागरिक यांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी मदत होते. मात्र, अनेक ठिकाणी या फलकांची अवस्था अशी झाली आहे की त्यावरून काहीही माहिती समजत नाही, अलट ते पाहून त्यांची दुरवस्थाच निदर्शनास येते. काही फलकांवर धूळ, घाण व शिंतोडे इतके साचले आहेत की त्याखाली फलकांवरील माहिती जणू बुजून गेली आहे.
काही ठिकाणी या फलकांवर विविध जाहिरातींचे पोस्टर्स चिटकविण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी फलकांवरचा मजकूर नाहिसा होतो आहे. काही फलक खूप जुने झाल्यामुळे तुटलेले किंवा वाकडे झाले आहेत. आणि काही होर्डिग्स किंवा झाडाच्या फांद्यांमुळे झाकले गेले आहेत. फलकांच्या या परिस्थितीमुळे नागरिकांची दिशाभूल होत असून त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
पुण्यातील मुख्य रस्ते म्हणजे शास्त्री रस्ता, डी.पी रस्ता, बाजीराव रस्ता येथे पाहणी करता लक्षात येते, की पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे अजूनही फलकावरील मजकूर नाहीसा होत आहे. विश्रामबागवाडय़ाची माहिती देणाऱ्या फलकावरील मजकूर अर्धा नाहीसा झाला आहे. तसेच, म्हात्रे पूल परिसरातील एक फलक तुटला असून सचिन तेंडुलकर जॉगिंगपार्कची माहिती देणाऱ्या फलकावरील मजकूर पूर्णपणे नाहीसा झाला आहे.
बुधवार पेठ तसेच दगडूशेठ मंदिरासमोरील बस थांब्याच्या फलकांवर जाहिरात चिटकवण्यात आली आहे. यामुळे बसची माहिती झाकली गेली असून पुणेकरांची गैरसोय होत आहे. स्वारगेट जवळील स्थलदर्शक फलक झाडाच्या फांद्यांमुळे, तर अप्पा बळवंत चौक येथील फलक वाहतूक नियमाच्या फलकामुळे झाकला गेलेला आहे. डी.पी. रस्यावरील सायकल मार्गाचे काही फलक तुटले आहेत.
एकीकडे स्मार्टसिटीचे स्वप्न पाहणाऱ्या पुणे महानगर पालिकेस दिशा व स्थलदर्शक फलकांकडे लक्ष देणेही जमत नसल्याचे दिसून आले आहे. नागरिकांच्या सोईसाठी महापालिकेने याकडे लक्ष घालावे,अशी मागणी हात आहे.
शहरातील माहितीदर्शक फलक बरबटलेले, पुसलेले अन् तुटलेले!
शहरातील स्थलदर्शक आणि दिशादर्शक फलकांची दुरवस्था हाेते अाहे.
Written by दिवाकर भावे

First published on: 05-09-2015 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: City boards in bad conditions