‘पीपीएन’ (प्रेफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क) ही योजना राबवायची असेल तर, शहरातील हॉस्पिटलला देण्यात आलेले उपचार दर हे नवी मुंबईतील हॉस्पिटलच्या धर्तीनुसार असावेत. अन्यथा या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हापासून शहरातील सर्व हॉस्पिटलमधून ‘कॅशलेस मेडिक्लेम’ बंद करण्यात येईल, असा इशारा हॉस्पिटलचालकांनी शनिवारी दिला.
उपचार दराच्या प्रमाणीकरणासंदर्भात चार विमा कंपन्यांचा समावेश असलेल्या जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन ऑफ इंडिया (जिप्सा) या शिखर संस्थेमार्फत शहरातील हॉस्पिटल्सची गळचेपी सुरू आहे. यासंदर्भात शहरातील हॉस्पिटलचाकलांची शनिवारी बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
शहरामध्ये ‘पीपीएन’ योजना राबविण्याचा विमा कंपन्यांचा प्रयत्न आहे. या योजनेच्या माध्यमातून कमी दरांत उपचार देण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, ‘जिप्सा’ने दिलेले हॉस्पिटलचे दर आम्हाला अमान्य आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळून लावण्यात आला आहे. नवी मुंबईतील हॉस्पिटल्सला दिले आहेत त्या धर्तीवरच पुण्यातील हॉस्पिटलला उपचार दर लागू करावेत. नाही तर, ही योजना लागू केल्यापासून ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना आम्ही बंद करू, असा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे आणि हॉस्पिटल बोर्ड सदस्य डॉ. नितीन भगली यांनी दिला.
विमा कंपन्यांची कॅशलेस मेडिक्लेम योजना बंद झाल्यावर रुग्णांवर आम्ही अवश्य उपचार करू. मात्र, रुग्णांकडून रोख रक्कम स्वीकारली जाईल. रुग्णांनी त्यांच्या उपचाराचा खर्च विमा कंपन्यांकडून घ्यावा. त्याचप्रमाणे उपचार खर्चाचा परतावा कमी मिळाल्यास विमा कंपन्यांच्याविरोधात ग्राहक मंचाकडे दाद मागा, असा सल्ला डॉ. भगली यांनी विमाधारकांना दिला आहे. कॅशलेस मेडिक्लेम योजना बंद करून आम्ही आमच्याच दराने उपचार देणार आहोत. कंपन्यांनी दिलेल्या दरात पहिल्या उपचारासाठी १०० टक्के, दुसऱ्या उपचारासाठी ५० टक्के तर, तिसऱ्या उपचारासाठी २५ टक्के खर्च दिला जाणार असल्याने हा प्रस्तावही मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader