डॉ. सतीश देसाई (माजी महापौर, पुणे महापालिका)

हे शहर माझे आहे आणि माझ्या शहरासाठी मला काम करायचे आहेया विचाराने पुण्यात नागरी संघटना उभी राहिली. पुण्याच्या विकासात नागरी संघटनेने मोलाची भूमिका बजावली. या संघटनेच्या तिकिटावर नऊ नगरसेवक निवडून आले होते. नागरी संघटनेची आजही नितांत गरज आहे. मात्र, पुढाकार कोणी घ्यायचा, हा प्रश्न आहे.

Innovation City
गिफ्ट सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातही होणार ‘Innovation City’, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
MHADA offices are now on lease Mumbai news
म्हाडाची आता भाडेतत्त्वावरील कार्यालये
Municipal Corporation Election, Pimpri Chinchwad ,
पिंपरी चिंचवड : “महानगरपालिकेत २०१७ ची पुनरावृत्ती होणार”, शंकर जगताप काय म्हणाले?
pm Narendra modi loksatta news
PM Narendra Modi : पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज
Pune city needs better mental health facilities pune
लोकजागर: शून्य शहर!
Shegaon taluka , Nandura taluka , hair fall ,
भय तिथले संपत नाही… केसगळती, टक्कल साथीचा शेजारी तालुक्यातही शिरकाव; रुग्णसंख्या दीडशेच्या घरात
pune best city for women loksatta news
महिलांना काम करण्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेल्या पहिल्या पाच शहरांत पुण्याला स्थान

नागरी संघटना ही पुण्याच्या सार्वजनिक आणि राजकीय जीवनामध्ये एक आदर्शवत कल्पना होती, असे माझे आजही मत आहे. पुणे महापालिकेचा कारभार सुरू झाल्यानंतर आयुक्त स. गो. बर्वे आणि महापौर बाबुराव सणस यांनी प्रशासनाचे आणि नगरसेवकांचे नेतृत्व केले. समाजवादी पक्ष, काँग्रेस त्यावेळचा जनसंघ या माध्यमातून लोक निवडणुका लढवत होते. पण, या शहराचा कारभार हा अधिक लोकाभिमुख व्हायला पाहिजे, अधिक चांगला व्हायला पाहिजे आणि राजकीय मतमतांतरे, मतभेद बाजूला ठेवून शहर म्हणून सगळ्यांनी एकत्र काम केले पाहिजे हा मूलभूत विचार या सगळ्याच्या मागे त्यावेळेला असावा किंवा होता, असे माझे प्रामाणिक मत आहे.

हेही वाचा >>> वर्धानपनदिन विशेष : सक्षम मानसिक आरोग्यासाठी

साधारणत: १९६५ च्या काळामध्ये मी समाजकारणामध्ये येऊ लागलो आणि १९६८ पासून राजकारणात सक्रियपणे काम करू लागलो त्यावेळी बाबुराव जगताप शहराचे महापौर झाल्याचे अजूनही स्मरत आहे. महापौरांना दिलेली गाडीसुद्धा न वापरता सगळ्या कार्यक्रमांना स्वत:हून चालत किंवा रिक्षाने जाणे, जे सोयीचे असेल त्याने जाणे हा एक आदर्शवत संस्कार समाजामध्ये पुढे झाला पाहिजे ही त्यामागची एक भावना होती. संस्काराबरोबरच शहराच्या विकासासाठी आपली मतमतांतरे बाजूला ठेवून ‘हे शहर माझे आहे आणि माझ्या शहरासाठी मला काम करायचे आहे’, असा विचार त्यावेळच्या धुरिणांपुढे असावा. नागरी संघटनेचे अर्ध्वयू म्हणू किंवा नागरी संघटनेचा कारभार हा पूनम हॉटेलमधून चालायचा. पूनम हॉटेल हे त्यावेळी नागरी संघटनेच्या चळवळीचे केंद्र होते आणि त्या केंद्राचे प्रमुख निळुभाऊ लिमये होते. १९७४ मध्ये झालेली महापालिकेची निवडणूक असेल, त्याच्याआधी १९६८ ला झालेली निवडणूक असेल, कुणाला या शहराचा महापौर करायचा आणि कारभार कसा हाकायचा यासंदर्भात बाळबोध विचारमंथन किंवा लोकांना समग्र सांगणं, करवून घेणं या सगळ्या गोष्टी पूनममध्ये निळुभाऊ लिमये आणि त्यांच्याबरोबरचे नेते करायचे. नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, त्यावेळचे बंडोपंत किल्लेदार यांच्या प्रभावामुळे त्या काळात पूर्व भागामध्ये नागरी संघटना अधिक जोरात होती. याचे कारण नागरी संघटनेवर ज्यांचा पगडा होता ते सो कॉल्ड सोशालिस्ट किंवा पुरोगामी म्हणता येईल अशा लोकांचा पगडा होता, असे मी त्या मांडवाखालून गेल्यानंतर माझे मत झाले.

निळुभाऊ लिमये यांच्याबरोबर त्या काळात शांताराम दिवेकर, वसंतराव थोरात, डॉ. बाबा आढाव ही सगळी माणसे होती. त्यांच्या जोडीला डॉ. बानू कोयाजी आणि श्री. ग. मुणगेकर यांचा नागरी संघटनेच्या उभारणीमध्ये आणि संघटनेला व्यापक अर्थाने लोकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये तगडा सहभाग होता. मात्र, निळुभाऊंचा शब्द हा अंतिम किंवा प्रमाण मानला जायचा. जनमानसामध्ये जाणारा, फिरणारा, माहिती घेणारा आणि लोकांना कामाला लावणारे व्यक्तिमत्त्व त्या काळात एकच होते आणि त्यांचे नाव निळुभाऊ लिमये. निळुभाऊ बोलतील ते पुण्यामध्ये व्हायचे. समाजकारण असेल, राजकारण असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल या सर्वांचा केंद्रबिंदू निळुभाऊ लिमये ही व्यक्ती होती. त्यांनी कधी जातीवरून भेद केला नाही. या शहरासाठी जो चांगला आहे, या शहरासाठी ज्याचा उपयोग होऊ शकेल, अशा कार्यकर्त्यांना संधी दिली.

हेही वाचा >>> वर्धानपनदिन विशेष : पुण्याचं विस्तारणारं शैक्षणिक क्षितिज

मी ज्या भागातून निवडणूक लढविली तो भाग वर्षानुवर्षे त्या काळातील जनसंघाचा होता. तेथून अण्णा जोशी दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. एकदा वसंतराव थोरात त्यांच्याविरुद्ध पराभूत झाले होते. पण, अण्णा जोशींना लढत कोण देऊ शकेल, असा विचार निळुभाऊंनी आणि वसंतरावांनी त्यावेळी केला. राजकारण, समाजकारण याच्याबाहेरची व्यक्ती आपण प्रवाहात आणू या विचारांतून मी छत्रपती पुरस्कारविजेता आणि खो-खो खेळाडू म्हणून या दोघांनी मला विचारले. वसंतराव एक दिवस दवाखान्यात आले आणि ‘या वेळी निवडणुकीला तुम्ही उभं राहायचं’, असे म्हणाले. त्यांनी सांगणे म्हणजे माझ्यासाठी तो आदेशच होता. ‘तात्या हे माझे काम नाही’, असे मी म्हणाल्यानंतर वसंतरावांनी निळुभाऊंना सांगितले. नंतर निळुभाऊ मला भेटायला आले. ‘सतीश, तू निवडणूक लढवायची आहेस’, असे त्यांनी सांगितले. शहराच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसे येऊ शकतात, शहरासाठी काही योगदान देऊ शकतात अशांना त्यांनी राजकारणात आणले. पूना गेस्ट हाऊसच्या गजानन सरपोतदार यांनाही त्यांनी निवडणुकीला उभे केले होते. सरपोतदार कुटुंबाचा कधी राजकारणाशी संबंध आला नाही. पण, चांगल्या प्रवृत्तीची माणसं राजकारणात आली पाहिजेत ही त्यांची भूमिका होती. शांतिलाल सुरतवाला हा त्यावेळचा तरुण गणपती मंडळाचा कार्यकर्ता होता. त्याच्या वडिलांचा मोठा व्यवसाय होता. पण, त्याच्यासारखा धडपड्या माणूस या प्रवाहात आला पाहिजे ही भूमिका घेऊन त्यालासुद्धा निळुभाऊंनी उभे केले होते.

शांताराम दिवेकर १९७४ मध्ये महापौर झाले तो प्रसंग अजून आठवतो. पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कार्यक्रमासाठी विद्यापीठात येऊ देणार नाही म्हणून त्यांच्या गाडीपुढे आडवे पडणारे आणि नंतर नागरी संघटना घराघरांमध्ये नेऊन पोहोचविणारे शांताराम दिवेकर होते. ‘राजकारणाचे जोडे काढून सभागृहात या’ ही नागरी संघटनेची टॅगलाईन होती. राजकारणाचे विचार बाजूला ठेवून तुम्ही शहराच्या विकासासाठी एकत्र या, ही निळुभाऊंची आणि नागरी संघटनेची धारणा होती. नागरी संघटना ही शहरामध्ये रूजली पाहिजे, वाढली पाहिजे हा त्यांचा विचार होता. पुणे शहरामध्ये नागरी संघटना यशस्वी झाली तर ती महाराष्ट्रात आणि देशभरात जाईल. आपण लावलेले हे रोपटे देशभरात गेले पाहिजे ही त्यांची दूरदृष्टी होती. राज्यसभा त्या काळी सुसंस्कृत लोकांचीच होती. पण, लोकसभा, विधानसभा किंवा राज्याराज्यांतील महापालिकांमध्ये अशा स्वरूपाची त्रयस्थ आघाडी लोकांनी केली तर, त्या शहराचा कारभार अधिक लोकाभिमुख होईल, त्यामध्ये सर्व विचारांना प्राधान्य मिळेल आणि खऱ्या अर्थाने त्या शहराचा विकास होण्यास मदत होईल. नागरी संघटनेच्या तत्वांमध्ये हेच बसत होते. जनसंघाचे गो. प्र. भागवत, रामभाऊ म्हाळगी, बाबा भिडे, शिवाजीराव आढाव अशी माणसे नागरी संघटनेत असती तर नागरी संघटनेला एक व्यापक स्वरूप आले असते. काही काळानंतर नागरी संघटना संपली. नागरी संघटनेच्या तिकिटावर आम्ही नऊ नगरसेवक झालो होतो.

नागरी संघटना काय देऊ शकते याचे उदाहरण म्हणजे शांताराम जावडेकर यांनी त्यांच्या बुद्धीने आणि लोकांच्या सल्ल्याने अंदाजपत्रकामध्ये प्रत्येक नगरसेवकाला वॉर्डस्तरीय तरतूद केली तर तो त्याच्या भागात चांगले काम करू शकेल ही योजना सुरू केली. वॉर्डस्तरीय तरतूद ही योजना नंतर राज्यसभा, लोकसभा, विधानसभा या सर्वांनी स्वीकारली त्याचा स्राोत जावडेकर यांच्या एका निर्णयामध्ये होता. नेमकं हेच निळुभाऊंना आणि नागरी संघटनेला अभिप्रेत होते. तुम्ही असे काम करा की ते शहराला ललानभूत ठरेल आणि त्याच्यातून तुम्ही देशासाठी काही करू शकाल ही भूमिका त्यामागे होती. पदे मिळाली खरी. पण, नंतर किती जण नागरी संघटनेत राहिले, हा वादाचा मुद्दा आहे. माझ्यासारखा माणूस नागरी संघटनेत राहिला नाही. नागरी संघटना ही शहरापुरती ठीक होती. पण, ज्याला व्यापक राजकारण करायचे आहे त्याच्यासाठी नागरी संघटना उपयुक्त ठरली असती का, याचे उत्तर आज देणे अवघड आहे. नागरी संघटनेतच राहिलो असतो तर मी विधानसभा निवडणूक लढवू शकलो असतो का? एखादा कार्यकर्ता लोकसभा निवडणूक लढवू शकला असता का? याचे उत्तर देणे अवघड आहे. पण, राजकारणी लोकांबद्दल जनतेच्या मनामध्ये टोकाची चीड आहे, निराशेची भावना आहे, नको ते राजकारण असा उबग आला आहे, असे वाटण्याच्या काळामध्ये नागरी संघटनेसारखी संस्था टिकली असती तर, शहराला आणि राजकारण्यांना एक चांगला आधार मिळाला असता. सर्वसामान्यांना आपले प्रश्न ऐकून घ्यायला पक्षाच्या पलीकडे कोणी माणूस आहे, हा दिलासा मिळणे गरजेचे आहे. हल्ली कोणी ऐकेल का ही शंका आहे. त्याकाळी हे होत होतं. म्हणून नागरी संघटना ही काळाची गरजच होती. नंतरच्या काळात मी आणि काही मित्रांनी नागरी संघटनेला पुनरुज्जीवीत करण्याचा विचार केला होता. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, रिपब्लिकन, वंचित बहुजन आघाडी या सगळ्या पक्षातील चांगल्या लोकांनी किमान महापालिका निवडणुकीमध्ये आपण पक्षाच्या हितापेक्षा शहराच्या हिताला प्राधान्य देऊ अशी भूमिका घ्यायला हवी. पण, आता राजकारण इतके पुढे गेले आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याने अशी भाबडी आशा ठेवू नये. पुण्यात जे पिकतं ते देशात विकलं जात अशी पूर्वी म्हण होती. पुण्यामध्ये हा विचार पुन्हा वर आला तर नवीन पिढीपुढे आदर्श निर्माण होईल. सुशिक्षित माणसे राजकारणात येण्यासाठी आणि शहर चांगले होण्यासाठी नागरी संघटनेची नितांत गरज आहे. कोणी पुढाकार घ्यायचा आणि हे करायचे हा वादाचा किंवा बिनवादाचा मुद्दा होऊ शकेल. असा पुढाकार घेतला गेला तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्यामध्ये निश्चित योगदान देईल. राजकारण हे अर्थकारण झाल्यामुळे असे होईल का, हा खरा प्रश्न आहे. कोणी तरी प्रयत्न केला तर काही तरी होऊ शकेल एवढी माफक अपेक्षा आहे.

Story img Loader