भारताचे ‘चांद्रयान-3’ हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरित्या चंद्राच्या दिशेने झेपावल्याचा अनुभव पिंपरी चिंचवड मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वर्गातूनच घेतला. सोनवणे वस्ती प्राथमिक शाळा, म्हेत्रे वस्ती प्राथमिक शाळा, मोहननगर प्राथमिक शाळा, रहाटणी मुलांची शाळा, पुनावळे मुलांची शाळा याठिकाणी विद्यार्थ्यांना वर्गांमध्ये स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रेक्षपणाद्वारे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारीचा क्षण अनुभवता आला.
हेही वाचा >>> “अर्थमंत्रीपदी अजितदादा, पण अंतिम निर्णय…”, खातेवाटपावरून दीपक केसरकरांची प्रतिक्रिया
‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावले. आसमंत हादरवणाऱ्या रॉकेटच्या आवाजात टाळ्यासह ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शास्त्रज्ञांची आणि स्वदेशी तंत्रज्ञानाची कमाल ‘याची देहि याची डोळा’ विद्यार्थ्यांनी अनुभवली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पुढाकार घेत दूरदर्शन वरून ‘चंद्रयान– 3’ थेट प्रेक्षपण पाहण्याची व्यवस्था करून देत संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या भारताच्या या चांद्रयान – 3 मोहिमेची माहिती दिली.
हेही वाचा >>> छगन भुजबळांना धमकी प्रकरणात आरोपीची अटक बेकायदा; जामिनावर मुक्तता
भारताची चांद्रयान-तीन ही मोहीम यशस्वी ठरली तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. चांद्रयान-3 अंतराळयान २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. चांद्रयान-3 ने ४० दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर विक्रम लँडरच्या साहाय्याने प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरेल. 3.84 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडलं तर, चांद्रयान २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचे उतरणं हे चांद्रयान-3 मोहिमेचं पहिलं लक्ष्य आहे. रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर तेथील माहिती गोळा करुन चंद्राची रहस्यं उलगडण्यास मदत होणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी देण्यात आली. या उपक्रमात मनपा शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.