महिलांची सुरक्षितता, वाहतूक, आरोग्य, पाण्याची साठवणूक अशा विविध क्षेत्रांतील उपलब्ध सुविधांची माहिती आता नागरिकांना एसएमएसद्वारे त्वरित मिळू शकणार आहे. अशा प्रकारची माहिती पुरविणारी ‘अ‍ॅप्स’ विकसित करण्यासाठी राज्य शासन आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी एकत्र आले आहेत.
शासनाच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्टतर्फे सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना एकत्र आणणाऱ्या ‘विंडोज अ‍ॅपफेस्ट’ या व्यासपीठाचे पुण्यात आयोजन करण्यात आले असून यात नागरी समस्यांवर उपाय सुचविणाऱ्या अ‍ॅप्सची कल्पना मांडणाऱ्या डेव्हलपर्सना प्रोत्साहन दिले जाणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान सचिव राजेश अगरवाल आणि मायक्रोसॉफ्टचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक संकेत अकेरकर यांनी याबाबत माहिती दिली.
अगरवाल म्हणाले, ‘‘सध्या सरकारकडे येणारा महसूल आणि सरकारी तिजोरीतून होणारा खर्च यांचे ७० टक्के व्यवहार ऑनलाईन चालत असून चार-पाच महिन्यांतच हे प्रमाण ९० टक्क्य़ांवर जाईल. शासकीय व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी मोठय़ा प्रमाणावर माहिती (रॉ डेटा) नागरिकांसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. रोजच्या जगण्यातील नागरी सुविधांबाबत माहिती देण्यासाठी उपयोगी पडणारी अ‍ॅप्स विकसित करण्यासाठी शासनातर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. या अ‍ॅप्समध्ये महिलांची सुरक्षितता, शिक्षण, वाहतुकीच्या सुविधा, आरोग्य सुविधा, पाण्याची साठवणूक या विषयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सांगली जिल्ह्य़ासह २-३ जिल्ह्य़ांत गावांमध्ये पाण्याचा टँकर, अन्नधान्य (रेशन) कधी पोहोचेल याची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.’’
या अ‍ॅपफेस्टमध्ये ७५ ते १०० सॉफ्टवेअर डेव्हलपर संस्थांनी सहभाग घेतला असल्याची माहिती अकेरकर यांनी दिली. अ‍ॅपफेस्टमध्ये समोर येणारी अ‍ॅप्स मायक्रोसॉफ्टच्या ‘अ‍ॅपलॅब’तर्फे तपासली व निवडली जाणार आहेत. ‘विंडोज अ‍ॅपस्टोअर’वर शासकीय कामे, आरोग्य, शिक्षण यासाठीच्या अ‍ॅप्ससाठी स्वतंत्र विभाग तयार करून तेथे निवडक अ‍ॅप्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा