लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : पदपथांवरील अतिक्रमणे, झोपडपट्ट्यांचा वाढता विळखा, पदपथांची दुरवस्था, रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या तसेच अपुरा आणि विस्कळीत पाणीपुरवठ्यासंदर्भात सातत्याने तक्रारी आणि त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन आणि पोलीस दाद देत नसल्याने आता विमाननगर येथील नागरिकांनी एकत्र येत लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
संदीप सिंग, लेफ्टनंट कर्नल सरवटे, अनिता हनुमंते, पवन शर्मा, रीता घोष आणि मीनल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १०० हून अधिक नागरिक एकत्र आले असून मूलभूत सुविधांसाठी त्यांनी लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात विमाननगर परिसरातील कोणार्क पार्क येथे या नागरिकांनी बैठक घेतली. त्यामध्ये मूलभूत सुविधा आणि हक्कांसाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा निर्धार करण्यात आला. परिसरातील समस्या सुटल्या नाहीत तर, आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.
आणखी वाचा-जेव्हा अजितदादा चक्क ३६० अँगलने व्हिडीओ बनवतात…!
विमाननगर परिसरातील दुकानांची वाढती संख्या, पदपथांचा अभाव आणि दुरवस्था, पदथांवर झालेले विविध प्रकारची अतिक्रमणे, वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकलेले प्रमुख रस्ते, चौक आणि उपरस्ते, विस्कळीत आणि अपुरा पाणीपुरवठा, वाढती गुन्हेगारी, रस्त्यावर जागोजागी आणि अस्ताव्यस्त पडलेला कचरा, प्लास्टिकची समस्यांबाबत या बैठकीत नागरिकांनी लक्ष वेधले. परिसरातील पंचतारांकित हॉटेल, पबमध्ये मध्यरात्री पर्यंत चालणाऱ्या पार्ट्या, त्यातून वाढलेली गुन्हेगारी, संगीत पार्ट्यांच्या नावाखाली होणारे ध्वनी प्रदूषण याचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून त्यासंदर्भात तक्रारी करून त्याची दखल घेतली जात नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सर्व समस्या सोडविण्यासाठी पोलीस आणि महापालिका प्रशासनावर दबाव टाकावा लागेल. त्यासाठी एकत्र येत लढा देण्याची दिशा बैठकीत निश्चित करण्यात आली. प्रश्न कायम राहणार असतील तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला.