राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना विविध मुद्य्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आगामी दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील असही स्पष्ट केले. तसेच, “ आम्ही व्यापक हिंदुत्वासाठी काम करत आहोत. न्यायालयाच्या निर्णयाबाबत भाष्य करणे योग्य होणार नाही. आम्हाला जे काही करायचे ते आम्ही महाराष्ट्रासाठी करू, राजकारण अजिबात करणार नाही.” असं देखील सांगितलं.
कल्याण लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून भाजपाकडून देखील दावा केला जात आहे, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे तिथून विद्यामान खासदार आहेत, त्यामुळे हा तिढा कसा सोडवणार? या प्रश्नावर उत्तर देताना केसकर म्हणाले, “ कोणी कशावर दावा करावा, हे प्रत्येकाच्या मनावर असतं. दावा करणं म्हणजे निवडून येणं नाही, हे अगोदर लक्षात ठेवलं पाहिजे. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, शिवसेना आणि भाजपाची अभेद्य युती ही महाराष्ट्रात होती. त्यानंतर मिशन १५१ कोणी काढलं? हे सर्वांना माहिती आहे. समोरच्या लोकांना दुखवायचं, जनतेच्या भावना दुखवायच्या, जनतेसमोर जाताना हिंदुत्ववादी पक्ष म्हणून जायचं आणि नंतर सत्तेसाठी आपल्या निष्ठा बदलायच्या. हे महाराष्ट्रच्या जनतेने कदापि सहन केलं नसतं.”
नेता हा जनतेमधला पाहिजे –
तसेच, “ यापेक्षाही महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. या राज्याची जी प्रगती खुंटलेली होती, ती महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडलेली नव्हती. देशाला अभिमान वाटावा अशी दैदिप्यमान कामगिरी महाराष्ट्र नेहमी करत असतो आणि त्याचं गतवैभव आम्हाला प्राप्त करून द्यायचं आहे. आम्हाला अजिबात राजकारण करायचं नाही. आम्ही रोज काम करतो, आमचे मुख्यमंत्री दिवसभरातील आठ-दहा तास काम करतात. त्यानंतर ते जनतेमध्ये मिसळतात. नेता हा जनतेमधला पाहिजे, जनतेच्या सुख-दुखात सहभागी होणारा पाहिजे. असेच नेते मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला जे काही करायचे ते आम्ही महाराष्ट्रासाठी करू, राजकारण अजिबात करणार नाही.” असंही यावेळी दीपक केसकर यांनी बोलून दाखवलं.
सगळ्या जिल्हापरिषदा देखील जिंकू –
याचबरोबर, “ आम्ही मूळातच भाजपा आणि शिवसेना एकत्र आहोत. अगदी मुंबई महापालिकेत आमचे १५० पेक्षा जास्त अस्तित्वातील नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड जिंकू. सगळ्या नगरपालिका तर जिंकूच परंतु सगळ्या जिल्हापरिषदा देखील जिंकू.” असा विश्वास देखील यावेळी केसरकर यांनी व्यक्त केला.
दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्रीच घोषणा करणार –
तर, “ दसऱ्या मेळाव्या संदर्भात जी घोषणा करायची ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत. बाळासाहेबांच्या विचारासाठी त्यांनी जसा लढा दिला, तसेच त्यांच्या प्रथा, पंरपरा कायम ठेवण्यासाठी देखील ते कटीबद्ध आहेत. परंतु काय करायचं याबाबतचा निर्णय ते घेतील. केवळ श्रेय घेण्यासाठी नाहीतर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या बद्दल त्यांना असलेला आदर, बाळासाहेबांची भूमिका, व्यापक हिंदुत्ववाद हे तत्व पुढे घेऊन मुख्यमंत्री शिंदे पुढे चालत आहेत. या विचारांचं पालन ते करतील, कुठलंही राजकारण ते यामध्ये येऊ देणार नाहीत.” असंही यावेळी दीपक केसकर यांनी स्पष्ट केलं.