शवविच्छेदनासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे पार्थिव ससून रुग्णालयात नेल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी येणारा प्रत्येकाच्या अश्रूंचा बांध सुटल्याने ससून रुग्णलयाचा परिसर गलबलून गेला होता. कार्यकर्त्यांनी ‘दाभोलकर अमर रहे, त्यांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही,’ अशा घोषणा देत भावना व्यक्त केल्या.
डॉ. दाभोलकर यांची गोळ्या घालून हत्या झाल्याचे पोलिसांना कळल्यानंतर लगेचच त्यांचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच त्यांचे सहकारी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने तेथे दाखल झाले. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात अडथळे उभे केले.
भाई वैद्य, अमोल पालेकर, अतुल पेठे, सुभाष वारे, नितीन पवार, नितीन देसाई, अजित अभ्यंकर, सुनीती सु. र., अच्युत गोडबोले, प्रवीण गांगुर्डे, किरण मोघे, अंकुश काकडे, अॅड. जयदेव गायकवाड हे घटनास्थळी दाखल झाले. तेथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केल्यानंतर हा सारा परिसर निनादून गेला. विवेकाचा आवाज दाबला जात आहे. दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून आयुष्य घालविले. त्यांना शेवटचा निरोप देई पर्यंत हा कायदा मंजूर करावा. पृथ्वीराज चव्हाण आणि अजितदादा यांनी याबाबत उत्तर द्यावे. धर्माध संस्थांवर बंदी घालावी, अशा घोषणा या वेळी देण्यात येत होत्या. मारेकऱ्यांना लवकर पकडावे, अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठाण मांडले.
ससून रुग्णालयापासून अंत्ययात्रा
दाभोलकर यांचे पार्थिव शनिवार पेठेतील साधना मीडिया सेंटरमध्ये आणण्यासाठी दुपारी पाऊणच्या सुमारास शववाहिनीत ठेवण्यात आले. शववाहिनी थेट मीडिया सेंटरमध्ये नेली जाणार होती. मात्र, या वेळी मोठय़ा संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी अंत्ययात्रेचा आग्रह धरला आणि आम्ही शववाहिनीबरोबरच चालत येणार असे म्हणत त्यांनी गाडीला गराडा घातला. याचवेळी कार्यकर्त्यांनी घोषणाही सुरू केल्या. दाभोलकर यांचे चिरंजीव डॉ. हमीद यांनी या वेळी उपस्थितांना समजवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी सदैव अहिंसेचाच पुरस्कार केला. ते विवेकाच्या मार्गाने गेले. आपणही त्याच मार्गाने जाणे आवश्यक आहे, अशा शब्दात त्यांनी सर्वाना शांत राहण्याचे, सहकार्य करण्याचे आवाहन केले. अखेर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे कार्यकर्त्यांच्याच चालीने हळूहळू गाडी मार्गस्थ झाली. लक्ष्मी रस्ता, नाना पेठ, मोती चौक, बेलबाग चौक, निंबाळकर तालीम चौकातून बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक मार्गे अंत्ययात्रा दुपारी दोन वाजता साधना मीडिया सेंटर येथे पोहोचली.
लक्ष्मी रस्त्यावर अनेक ठिकाणी नागरिक आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. ‘दाभोलकरांना मारून विचार मरणार नाहीत,’ ‘आम्ही सारे दाभोलकर’ असे फलक हातात घेतलेले अनेक जण अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. वाटेत काही ठिकाणी शोकाकुल अवस्थेत चालणारे कार्यकर्ते संतप्त होत होते आणि मग आक्रमक घोषणा दिल्या जात होत्या. त्यामुळे डॉ. हमीद यांनी कार्यकर्त्यांना अशा घोषणा न देण्याबाबत समजावले.
साधना मीडिया सेंटर येथे अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. अंत्ययात्रा तेथे पोहोचताच अनेकांना दु:ख अनावर झाले, तर काही जणांनी जोरदार घोषणा देत या घटनेचा निषेध केला. दाभोलकर यांच्या पार्थिवाला पुणेकरांच्या वतीने महापौर वैशाली बनकर यांनी पुष्पहार अर्पण करून यावेळी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर मोहन धारिया, डॉ. जयंत नारळीकर, गिरीश बापट, मोहन जोशी, विद्या बाळ, रझिया पटेल, डॉ. दीपक टिळक, ज्योती सुभाष, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, मकरंद साठे, गजानन परांजपे, उमेश कुलकर्णी, आलोक राजवाडे, पुरुषोत्तम खेडेकर यांच्यासह उपस्थितांनी दाभोळकर यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर दुपारी तीन वाजता दाभोलकर यांचे पार्थिव साताऱ्याकडे नेण्यात आले.
पोलीस आयुक्तांना विचारला जाब
ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा मृतदेह नेण्यात आल्याचे समजताच या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. या ठिकाणी पोलीस आयुक्तांपासून वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ हे येथील बंदोबस्त लावून निघू लागले असता सुभाष वारे त्या ठिकाणी आले. त्यांनी आयुक्तांना ‘हे काय सुरू आहे. कार्यकर्त्यांचे वेगवेगळे एसएमएस येत आहेत,’ असा प्रश्न उपस्थित केला. त्या वेळी त्यांच्या सोबत असणाऱ्या कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी ‘पुणे पोलीस काय करत आहेत. महाराष्ट्र शासन काय काम करतेय.’ असा जाब आयुक्तांना विचारला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा