प्रवेशपत्र समाजमाध्यमात आल्याच्या प्रकरणाचा तपास करून एमपीएससीचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आयोजित स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिका समाजमाध्यमात आल्याने रविवारी खळबळ उडाली होती. त्यानंतर आयोगाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. त्यानंतर एमपीएससीने या प्रकरणाबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिक ऑनलाइन नाहीत. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने प्रश्नपत्रिका मिळवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केवळ बाह्य दुव्यावर उपलब्ध केलेल्या काही पीडीएफ स्वरुपातील प्रवेशपत्रांव्यतिरिक्त अन्य कोणताही विदा नाही. उमेदवारांच्या विदाशी छेडछाड झालेली नाही, असे एमपीएससीने सोमवारी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एमपीएससीतर्फे ३० एप्रिलला होऊ घातलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षेची प्रवेशपत्रे समाजमाध्यमांत फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी उघडकीस आला. त्याशिवाय त्याशिवाय समाजमाध्यमावरील समूहावर एमपीएससी उमेदवारांचा विदा ‘लीक’ झाल्याचा, प्रश्नपत्रिका आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकारामुळे राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर एमपीएससीकडून उमेदवारांची प्रवेशपत्रे समाजमाध्यमात आल्याची कबुली देत उमेदवारांचा विदा सुरक्षित असल्याचा, प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचा खुलासा केला. तसेच सीबीडी बेलापूर येथील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. या पार्श्वभूमीवर प्रणालीची अधिक तपासणी करून एमपीएससीने पुन्हा सोमवारी सविस्तर माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

हेही वाचा >>>पुणे: संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

आयोगाच्या दोन संकेतस्थळांपैकी https://mpsc.gov.in या मुख्य संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्दीपत्रके, निकाल, अभ्यासक्रम आदी माहिती पीडीएफ स्वरुपात दिली जाते. उमेदवारांचा वैयक्तिक विदा ठेवला जात नाही. तर ऑनलाइन प्रणालीसाठी स्वतंत्र असलेल्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांचे खाते, विविध जाहिरातींसाठीचे अर्ज, प्रवेशपत्रे, गुणपत्रक असा तपशील दिला जातो. ३० एप्रिलच्या परीक्षेला ४ लाख ६६ हजार ४५५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने आयोगाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीवर प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिल्यास सर्व्हरवर ताण येत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याविना उमेदवारांनी प्रवेशपत्र उतरवून घेण्यासाठी मुख्य संकेतस्थळावर वेगळा दुवा उपलब्ध करून दिला जातो. मात्र या बाह्य दुव्याच्या वेब पेज कोडमध्ये छेडछाड करून काही उमेदवारांची प्रमाणपत्रे समाजमाध्यमातील समूहाने मिळवल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित बाह्य दुवा बंद करण्यात आला. समाजमाध्यमातील त्या समूहाने उमेदवारांचा विदा, प्रश्नपत्रिका मिळवल्याचा दावा केल्याने आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने विविध सर्व्हरवर होणाऱ्या हिट्सचा तपास करून संशयित आयपी ॲड्रेस मिळवला. त्यातून बाह्य दुव्यावर उपलब्ध केलेली प्रवेशपत्रे वगळता अन्य कोणताही विदा नसल्याची खात्री झाली. ऑनलाइन प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या विदाशी छेडछाड झाल्याचे दिसून आले नाही. प्रश्नपत्रिका ऑफलाइन असल्याने त्या मिळवण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे नमूद करण्यात आले. एमपीएससीच्या रविवारच्या प्रसिद्धिपत्रकानंतर उमेदवारांचा वैयक्तिक विदा, प्रश्नपत्रिका असल्याचा दावा करणारी पोस्ट संबंधित समाजमाध्यम समूहातून हटवल्याचे दिसून येते, असेही स्पष्ट करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clarification of mpsc investigating the issue of admit card being leaked on social media ccp 14 amy
Show comments